वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर होत आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातले भाजपा आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
यावेळी मला आशिर्वाद देण्यासाठी आलेली गर्दी पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडाली असेल, असे म्हणत नरेंद्र मोदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, शरद पवार देशातील एक वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. ते कोणतेही काम विचारपूर्वक करतात.देशातील वारं कोणत्या दिशेने वाहतंय हे त्यांनीही ओळखले आहे. मतदानापूर्वीच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि अचानक राज्यसभेत खूश असल्याचे जाहीर केले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
त्याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर निशाना साधत पवार कुटुंबात अंतर्गत कलह असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'स्वतःच्या पुतण्याकडूनच शरद पवारांची दांडी गुल्ल झाली. शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत.' तसेच, अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाची आठवण नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, 'विसरु नका, जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिले? त्यांना असे उत्तर दिले की, जे मी बोलूही शकत नाही.'
ज्यावेळी मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश देण्यात आला. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण शरद पवार यांनी कोणचीच पर्वा केली नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.