चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राजकीय वादात कारण नसताना गुन्हा घडेल, या पद्धतीने मतप्रदर्शन करणे, एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील, अशा पद्धतीने मेसेज पोस्ट करणे, एखाद्या तरुण, तरुणीची बदनामी करण्यासाठी फेक प्राेफाईल बनविणे, असे सर्व प्रकार फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून होत असल्याचे समोर येत आहे. असे असताना माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रती असलेले अज्ञान आणि आततायीपणा सायबर गुन्हेगारीला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या असून सायबर सेलकडे तक्रारी येत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात आठ ते दहा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना भान बाळगलेलेच बरे, अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. नागरिकांनी लाईक, शेअर, फॉरवर्ड जपून करण्याची गरज असल्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे. सध्या सायबर भामटे सक्रीय झाले असून विविध प्रकारे गंडविण्याचे नवनवे फंडे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या मेल्स तसेच लिंकपासूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून nसोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी सावधानता बाळगून वापर करण्याची गरज आहे. फेक बॅंकिंग ॲप, फेक वेबसाईट, नायजेरियन फ्राॅड, फेसबुक फ्राॅड, क्लोनिंग, आयडेंटिटी चोरी, हनी ट्रॅप, अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मुलींनो, डीपी सांभाळाnमुलींनी फेसबुकवर स्वत:चे प्रोफाईल फोटो ठेवू नये, अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच प्राेफाईल लॉक करून ठेवावी. तसेच व्हॉट्सॲपवर डीपी ठेवताना ‘ओन्ली माय कॉन्टॅक्ट’ या सेटिंगचा वापर करावा. जेणेकरून कुणीही आपला प्राेफाईल फोटो किंवा व्हॉट्सॲप डीपी कॉपी करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
सोशल मीडियावर बदनामी; ८ जणांवर गुन्हे - सायबर सेलकडे जिल्ह्यातील आठ ते दहा तक्रारींचा समावेश असून पोलिसांनी त्यांना अटक करून जेलची हवा खाऊ घातली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कांबळे हे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर वॉच ठेवून आहेत.
भावनांवर घालावा आवर - सामाजिक माध्यमांवर व्यक्त होण्यापूर्वी आपण करतोय ते योग्य आहे का, याची खातरजमा करूनच खरं व्यक्त झाले पाहिजे. आपल्या एखाद्या पोस्टमुळे वादंग होणार असेल तर अशा प्रकारे व्यक्त न झालेलेच योग्य राहील. भावनांना आवर घातला पाहिजे. राजकीय चिखलफेकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी न होणे केव्हाही चांगले.