लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कुटुंबातील घुसमट कुटुंबातीलच बच्चेकंपनीवर विपरित परिणाम टाकतात, हे कटू सत्य आहे. अशाच काहीशा घुसमटीला वैतागून वर्धा शहरातील गिट्टी खदान भागातील एका १२ वर्षीय मुलीने रागाच्या भरात शनिवारी सकाळी घर सोडले.
सायंकाळी उशीर झाला तरी मुलगी घरी न आल्याने कुटुंबाकडून शोध सुरू झाला. पण मुलगी न मिळाल्याने कुटुंबीयांनी अखेर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आपले चक्र फिरवित त्या मुलीला हिंगणघाट येथून ताब्यात घेतले. ज्यावेळी या मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जात होते त्या प्रसंगी या मुलीने दबक्या आवाजात ‘मला आईकडे नव्हे तर आजीकडे जायचे’ असे पोलिसांना सांगिल्याने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या.
पोलिसांनीही ही अल्पवयीन मुलगी अशी का म्हणाली याबाबत अधिकची चौकशी केली असता कुटुंबात होणाऱ्या घुसमटीमुळे ती वैतागली असल्याचे पुढे आले. अखेर त्या मुलीला शहर पोलिसांकरवी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे तिच्या आजीकडे नेऊन सोडण्यात आले. विशेष म्हणजे या १२ वर्षीय मुलीच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तर आई रोजमजुरी करून उदरनिर्वाह करते. तर लहान भाऊ अकरा वर्षांचा आहे.
मुलीने घर सोडल्यावर ती भटकंती करीत असलाना ती तिच्या हयात नसलेल्या सावत्र वडिलांच्या नातेवाईकांना दिसून आली. त्यानंतर तिला समजवून हिंगणघाट येथे नेण्यात आले होते. सध्या ही मुलगी तिच्या आजीकडे सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.