लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात मागील वर्षी तूर विक्री करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. यावर्षीही शासनाने अनेक जाचक अटी तूर खरेदीच्याबाबत लादलेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने सरकारच्या विरोधातील धार तीव्र करताना तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध केंद्रांवर शिवसेनेचे पदाधिकारी नेमले आहेत. ते शेतकऱ्यांना यासाठी मदत करणार आहे.विदर्भात अनेक जिल्ह्यात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापसाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाले. व कापूस वेचाईचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. याचा थेट परिणाम तूरीच्या उत्पादनावर ही झाला आहे. तूर उत्पादन समाधानकारक झाले नाही. शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीचे केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आॅनलाईन नोंदणी करीत नसल्याने केंद्रावर आल्यावर त्याच्या अडचणी वाढतात. अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्यात शिवसेनेने आर्वी भागात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांची नियुक्ती केली आहे. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरू करण्यात आली आहे. येथे गेल्यावर्षी ६० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली यावेळीही शेतकऱ्यांची संपूर्ण तूर वेळेतच खरेदी केली गेली पाहिजे यासाठी शिवसेनेने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. कारंजा, आष्टी, आर्वी बाजार समितीत मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. व शेतकऱ्यांच्या अडचणी तेथे सोडविण्यात येत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाला शह देण्यासोबतच शिवसेना शेतकऱ्यांसोबत कायम स्वरूपी उभी हे दाखविण्यात शिवसेनेचा प्रयत्न आहे. ८० टक्के समाजकारण या धोरणानुसार सदर कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही हिंगणघाट तालुक्यात कर्जमाफीच्या संदर्भात मदत केंद्र सुरू करण्यात आले होते.आर्वी विधानसभा मतदार संघात आष्टी, कारंजा, आर्वी बाजार समितीअंतर्गत आर्वी आणि कारंजा येथे शिवसेनेने मदत केंद्र सुरू केले आहे. आपण स्वत: व शिवसेनेचे तालुका संघटक, उप तालुका संघटक व तालुका प्रमुख शेतकऱ्यांना या कामासाठी मदत करीत आहो.निलेश देशमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना, वर्धा.
राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी शिवसेना दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 2:56 PM
शिवसेनेने सरकारच्या विरोधातील धार तीव्र करताना तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध केंद्रांवर शिवसेनेचे पदाधिकारी नेमले आहेत.
ठळक मुद्दे सरकारला शह देण्यासाठी शेतकऱ्यांना हात