मुख्य व्यवस्थापकाशी चर्चा : दररोज एक हजार क्विंटल खरेदीची दिली हमी आर्वी : नाफेडद्वारे शेतकऱ्यांच्या तूर मालाची खरेदी १ जानेवारी रोजी सुरू करण्यात आली; पण २९ मार्चपर्यंत केवळ १ हजार १२६ शेतकऱ्यांची २६ हजार ६०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तूर विकावी लागली. या विरूद्ध शिवसेनेने मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत ठिय्या आंदोलन केली. तूर खरेदीतील सातत्य टिकवून अधिकाधिक शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची मागणी केली. तालुक्यातील ३५०० शेतकऱ्यांची अंदाजे ९० हजार क्विंटल तुरीच्या मालाची नोंद नाफेडकडे करण्यात आली. ३ महिन्यांपासून नाफेडची तूर खरेदी प्रक्रिया ढिसाळ, निष्काळजीपणे तथा शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. याबाबत तक्रारी मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती गाठून फसवणुकीबाबत निषेध नोंदविला. बाजार समितीचे सचिव व नाफेडच्या अधिकाऱ्यांनाही विचारणा केली. नाफेडच्या तूर खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर खरेदी करून तिच तूर नाफेडला अधिक भावात विकण्याचा व्यापाऱ्यांचा गंभीर प्रकार सुरू होता. याबाबत शिवसेनेने तीव्र निषेध नोंदविला. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची तूर खरेदी थांबविली. नाफेडचे मुख्य व्यवस्थापक नागपूर यांच्याशी चर्चा करण्यात आली. यात शेतकऱ्यांंच्या नोंदणीनुसार तूर खरेदी प्रक्रिया सुरू केली जाईल. दररोज एक हजार क्विंटल तूर खरेदी करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. ठिय्या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख देशमुख यांच्यासह गणेश आजणे, मनीष अरसड, गौरव देशमुख, विशाल देशमुख, निलेश बंगाले, अखिलेश वाघमारे यासह शिवसेना तथा युवसेनेचे कार्यकर्ते यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)
तूर खरेदीसाठी बाजार समितीत शिवसेनेचा ठिय्या
By admin | Published: April 05, 2017 12:35 AM