वीज पुरवठाही वारंवार खंडित : वापर नसतानाही वाढीव देयके वायगाव (नि.) : परिसरातील गावांमध्ये वीज ग्राहकांना उन्हाळ्यात मोठ्या रक्कमेची देयके मिळत होती. पावसाळ्यात विजेचा वापर कमी असल्याने वीजबिलात कपात होईल अशी आशा होती. मात्र जून व जुलै महिन्यातही ग्राहकांच्या हाती भरमसाठ वीजदेयके पडली आहेत. अधिक वापर नसतानाही वाढीव बिलांचा शॉक नागरिकांना बसला आहे. उन्हाळ्यात विजेचा वापर अधिक असल्याने ग्राहकांनी बिलाकडे दुर्लक्ष करून वेळेत वीजदेयकाचा भरणा केला. वर्धा तालुक्यात १२ जून पासून पाऊस सुरू झाला. पावसामुळे विजेची मागणी आपोआपच कमी झाली. वातावरण थंड झाल्याने घरातील कुलर, पंखे आदीचा वापरही कमी झाला. यामुळे विजेचे दरमहा मिळणारे देयक कमी होईल अशी आशा ग्राहकांची होती. मात्र महावितरण कडून जून आणि जुलै महिन्याची बिले अतिरिक्त प्रमाणात देण्यात आल्याची ओरड होत आहे. जूलै महिन्यात तर संततधार पाऊस सुरू असल्याने विजेचा वापर बराच कमी झाली. असे असताना ग्राहकांना उन्हाळ्याच्या तुलनेत फक्त १५ ते २० टक्क्याने कपात होऊन वीजदेयके मिळाल्याची ओरड होत आहे.(वार्ताहर) महावितरणचा भोंगळ कारभार सुरूच वर्धा - तुळजापूर(बघाळा)येथील विद्युत प्रवाह ऐन रात्रीच्या वेळेस वारंवार खंडित होतो. परिणामी ग्रामस्थांना अंधाराचा सामना करीत रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे सेवाग्राम आणि मदनी विद्युत वाहिनी कुचकामी ठरत असल्याची ओरड होत आहे. येथील थ्री फेज ट्रान्सफार्मर कांबळे यांच्या शेतात आहे. वादळाच्या तडाक्यात हमखास विद्युत प्रवाह खंडित होतो. याच वाहिनीवर वघाळा-तुळजापूर ची नळयोजना आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. भर पावसाळ्यात यामुळे पाणीटंचाईचा सामनाही नागरिकांना करावा लागत असल्याने ते संताप व्यक्त करीत आहेत. विद्युत देयक ही देखील कधीच वेळेच्या आत येत नाही. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त भार सोसावा लागतो. कालबाह्य झालेले ट्रान्सफार्मर तातडीने बदलावे अशी मागणी महावितरणच्या खरांगणा(गोडे) येथील उपविभागीय कार्यालयाला नागरिकांद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पावसाळ्यातही अतिरिक्त देयकाचा ‘शॉक’
By admin | Published: August 15, 2016 12:58 AM