वर्धा : पावसाळ्याच्या दिवसांत अनेक रस्ते चिखलमय होत नागरिकांना साधे पायी जाणेही कठीण होते. असाच काहीसा प्रसंग उद्भवत चक्क बैलबंडीतून मृतदेहाचा अखेरचा प्रवास करावा लागल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट तालुक्याच्या वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खैराटी या पारधी बेड्यावर घडली. या घटनेमुळे ग्रामीण रस्त्यांचा विषय पुन्हा एकचा चव्हाट्यावर आला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत खैराटी हा पारधी बेडा येतो. या लोकवस्तीत ये-जा करण्यासाठी पक्का रस्ताच नाही. येथील रहिवाशांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागते. खैराटी पारधी बेडा येथील रहिवासी विनोद भोसले या व्यक्तीची रात्रीच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वाटेतच विनोद यांनी अखेरचा श्वास सोडला, तर शुक्रवारी विनोद भोसले याचे शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
रुग्णवाहिकेच्या साहाय्याने विनोदचा पार्थिव गावाच्या वेशीपर्यंत आणण्यात आला. मात्र त्यानंतर वाहनच जात नसल्याने विनोदचे पार्थिव बैलबंडीत टाकून गावात न्यावे लागले. यावेळी रस्ता तातडीने बांधण्यात यावा, अशी मागणी उपस्थितांकडून एकमुखाने झाली.