आर्वी येथील घटना : गल्ल्यात होती रक्कम आर्वी : दुकानाचे शटर तोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना आर्वी येथील नेहरू मार्केट परिसरात गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी दुकान मालक मोहम्मद सलीम अब्दुल अली (३४) रा. विठ्ठलवॉर्ड आर्वी यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सुत्रानुसार, मोहम्मद सलीम अब्दुल अली यांचे नेहरू मार्केटमध्ये कपड्याचे मोठे दुकान आहे. सोबतच इतरही साहित्याची विक्री ते करतात. गुरुवार हा आर्वी येथील बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे येथे ग्राहकांची गर्दी असते. रात्रीपर्यंत दुकानात ग्राहकाचंी वर्दळ असल्याने अली यांनी आलेला पैसा घरी न नेता दुकानातील गल्ल्यातच ठेवला. हिच संधी साधत अज्ञात चोरट्याने ती संपूर्ण रोकड लंपास केली. यात अली यांचे मोठे नुकसान झाले.याप्रकरणी त्यांनी आर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरूद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.(तालुका प्रतिनिधी)
दुकानाचे शटर तोडून साडे तीन लाखांची रोकड लंपास
By admin | Published: June 13, 2015 2:11 AM