तळेगाव (श्या.पं.) : प्रत्येक शनिवारी येथील आठवडी बाजार भरतो; पण बाजारातील अधिकाधिक दुकाने जागा असताना मुख्य रस्त्यावरच थाटली जातात. परिणामी, बाजारात येणाऱ्या ग्राहकांना मोकाट गुरांचा सामना करावा लागतो. शिवाय रस्त्यावरील दुकाने व ग्राहकांची गर्दी, यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होतो. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बाजारासाठी पूरेपूर जागा उपलब्ध असताना येथील आठवडी बाजारातील दुकाने मुख्य रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली जातात. यामुळे जुन्या वस्तीकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील बाजाराचा तालुक्यात दुसरा क्रमांक लागतो. या आठवडी बाजारात आर्वी, आष्टी, तिवसा, सारवाडी, पार्डी यासह अन्य गावांतील व्यापारी, शेतकरी माल विकण्यासाठी येतात. दुपारनंतर बाजारात गर्दी वाढते. परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहक बाजारहाट करण्याकरिता येथे येतात. सायंकाळी ८.३० ते ९ वाजेपर्यंत बाजारात ग्राहकांची रेलचेल असते. यात मोकाट गुरेही हजेरी लावतात. मोकाट गुरांच्या संचारामुळे ग्राहकांसह व्यापारीही त्रस्त झाले आहेत. गुरांच्या धावपळीत बाजारातील महिला व पुरूषांना जखमी व्हावे लागत असल्याचेही दिसते. दिवसभर हाच प्रकार होत असल्याने व्यापारी व ग्राहकांत असंतोष पसरतो. धावत सुटलेल्या गुरांमुळे कधी कुणाचे नुकसान होईल, हे सांगणेच कठीण झाले आहे. आठवडी बाजार भरत असलेल्या जागेपासून काही अंतरावरच रिकामी जागा आहे; पण त्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जातो. परिणामी, अर्धाधिक बाजार मुख्य रस्त्यावरच भरत असल्याचे दिसते. बाजाराच्या आतमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत ही दुकाने थाटली तर रस्त्याने जाणाऱ्या बैलबंडी, दुचाकी व अन्य वाहनधारकांना सोयीचे होऊ शकेल; पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. ग्रा.पं. प्रशासनाने गावात दवंडी देत शेतकऱ्यांना गुरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश देणे गरजेचे आहे. शिवाय मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांना आतील जागेत बसण्याची नोटीस देणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर) रस्त्यावरील दुकादारांवर दंडात्मक कारवाईची गरजबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना व्यापारी मुख्य रस्त्यावर दुकाने थाटतात. परिणामी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे बाजारात नागरिकांना तसेच रस्त्यावर वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जागा असताना दुकाने रस्त्यावर
By admin | Published: March 14, 2016 2:11 AM