ग्रामस्थांमध्ये असंतोष : सागर युवा सामाजिक संघटनेचे प्रशासनाला साकडेवर्धा : पुलगाव केंद्रीय दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोटात आगरगाव, पिपरी खराबे तसेच इतर गावांत झालेल्या घर तसेच इतर साहित्याची नुकसान भरपाई अत्यल्प मिळाली. आगरगाव येथील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले असताना त्यांना मिळालेली भरपाई हजारात आहे. ती नुकासानीचा एक भागही नाही. यामुळे योग्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सागर युवा सामाजिक संघटनने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन देण्यात आले.सर्वेक्षणानुसार घर व इतर साहित्याच्या नुकसानापोटी ग्रामस्थांना २००, ३००, ५००, ७००, ८००, ९००, १००० व ११०० यानुसार नुकसान भरपाई मिळाली आहे. या निधीतून मिस्त्री, रोजंदार सांगायचा की, दुरूस्ती करण्यासाठी लागणारे साहित्य रेती, सिंमेट आदी खरेदी करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्फोटामध्ये घरांचे तसेच इतर साहित्याची नुकसान योग्य नुकसान भरपाई देऊ शकत नसेल तर प्रशासनाने स्वत: दुरूस्ती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. १५ दिवसांत आगरगाव तसेच इतर गावांतील नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सागर युवा सामाजिक संघटनच्या आगरगाव शाखा व ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदन देताना सागर युवा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कुत्तरमारे, जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत काळे, आगरगाव शाखा अध्यक्ष विजय चावट, शाखा उपाध्यक्ष प्रवीण रोंगे, आशिष इंगोले, अमित जवंजाळ, प्रशांत शेंडे, प्रफूल कांबळे, प्रवीण राऊत, अतुल हांडे, गौरव सुरूसे, अंकित इंगोले, चेतन काकडे, हर्षल मून यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
पुलगाव स्फोटातील नुकसानग्रस्तांना अल्प नुकसान भरपाई
By admin | Published: July 03, 2016 2:08 AM