बोपापूर येथील प्रकार : चना, कपाशीचे नुकसान देवळी : बोपापूर (दिघी) येथील शेतकऱ्यांच्या शेतात चिखली लघुकालव्याचे ‘आऊटलेट’ काढण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान होत आहे. लघुकालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे कुठेही नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. निम्न वर्धा प्रकल्प प्रशासनाच्या बेबंदशाहीमुळे हा प्रकार घडत असल्याची टिका होत आहे. मौजा बोपापूर दिघी शिवारात रमेशराव मुंजे, सुधाकर भोयर, अशोक मुंजे, शरद राऊत व इतर शेतकऱ्यांची शेती आहे. या शिवारात गिरोली शाखा कालवा येथून चिखली लघुकालवा काढण्यात आला आहे. हा लघुकालवा रोकडे यांच्या सुबाभळीला लागून पुढे जाऊन तक्रारकर्त्या शेतकऱ्यांच्या शेताकडे वळता करण्यात आला आहे; पण या लघुकालव्याचे आऊटलेट नाल्यात न काढता या शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात आले. यामुळे या लघुकालव्यातून सोडण्यात येणारे पाणी थेट या शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील चणा, कपाशी ही पिके पाण्यामुळे खरडून निघाली आहेत. वारंवार येणाऱ्या पाण्यामुळे चण्याचे पीक हाती येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत निम्न वर्धा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. निम्न वर्धा प्रकल्प विभागाने याकडे लक्ष देत लघुकालव्याचे आऊटलेट बंद करावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
लघुकालव्याचे ‘आऊटलेट’ शेतकऱ्यांच्या शेतात
By admin | Published: January 23, 2017 12:42 AM