वाटर कप स्पर्धा : विविध स्तरांवरील समाजसेवकांचाही पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्याच्या ५२ गावांचा सहभाग आहे. यातील काही गावांत उत्साहात कामे होत आहे. या जलसंवर्धन प्रक्रियेत डॉक्टरही मागे नाहीत. गावांत डॉक्टरांसह व्यावसायिक, नोकरदार, संस्थांचे कार्यकर्ते आदींचे हात श्रम करताना दिसत आहेत. एरवी एसीमध्ये राहणारे डॉक्टर ४५ अंशांच्या तप्त उन्हात श्रमदान करताना तसेच उच्चभू्र व सुशिक्षित मान्यवरांची ही श्रूखंला ग्रामस्थांचा उत्साह वाढवित आहे. डॉक्टर्स म्हटले की सरकारी वा खासगी रुग्णालय, रुग्णांची तपासणी, वातानुकुलीत कॅबीन, गळ्यात टेटॅस्कोप, इंजेक्शन असे काहीसे चित्र डोळ्यासमोर येते; पण यापेक्षा वेगळेच वास्तव गावोगावी अनुभवास येत आहे. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावांत जलसंवर्धनाची चळवळच उभी होत आहे. स्पर्धा असली तरी काही गावांत या स्पर्धेला चळवळीचेच स्वरूप आले आहे. गावातील बहुतांश हात या कार्यात गुंतले आहे. ग्रामस्थ स्वत:ला झोकून देत बंधारे, समतल चर, कंटूर बंडींग, दगडी, मातीचे बांध आदी कामांसाठी दिवसरात्र कुदळ, फावड्यांत व्यस्त होत असल्याचे दिसते. या कार्यात वर्धा, आर्वीसह अन्य ठिकाणच्या डॉक्टरांनीही सहभाग वाढविला आहे. डॉक्टरांसह व्यावसायिक, नोकरदार, समाजसेवक, विद्यार्थी, विविध संस्थांचे कार्यकर्ते आदींचा उत्साह वाखाणण्याजोगा ठरत आहे. काही डॉक्टरांनी या कामात वाहूनच घेतल्याचे दिसते. पाण्याचे महत्त्व जाणून घेत ४५ अंशांवर पारा असताना डॉक्टरांसह शहरातील एसीच्या गारव्यातून बाहेर पडत श्रमदान करणारे हात पाहून ग्रामस्थ जोमाने श्रमदान करताना दिसतात. अनेक जण तर माझा तालुका, माझे गाव, माझा जिल्हा यात सुरू असलेल्या या उपक्रमात माझा सहभाग असावा, या भावनेतून २००, ४०० किमीचे अंतर कापून श्रमदानाकरिता गावांत येत आहे. अनेक वर्षांपासून दुरावा निर्माण झाला असला तरी वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावाची भावनिक ओढ स्वस्थ न बसू देणारीच ठरत आहे. तरुण, तरुणी असो की ज्येष्ठ नागरिक सामाजिक जाणीवेने झपाटलेल्या व्यक्ती श्रमदानाकरिता वेळ काढून गावांत येत आहे. काही तास श्रमदान करून गावी परतताना त्यांच्या चेहऱ्यांवर कामाचे समाधानही दिसते. शहरातून गावाकडे वळणारी ही पावले ‘खेड्यांकडे चला’ हा संदेश पुन्हा देत असल्याचेच दिसते.
जलसंवर्धनासाठी डॉक्टरांचे गावात श्रमदान
By admin | Published: May 15, 2017 12:39 AM