लोकमत न्यूज नेटवर्कविरुळ (आकाजी) : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील ५२ गावांनी सहभाग घेतला आहे. गावाला पाणीदार करण्याच्या प्रयत्नात ग्रामस्थ रणरणत्या उन्हातही श्रमदान करीत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमुळे ग्रामस्थ आपसातील मतभेद विसरून कामाला लागले आहे. येथील सरपंच साधना उईके यांनी सहा महिन्याचे बाळ असताना श्रमदानात सहभाग घेतला. यामुळे ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळत आहे. श्रमदानात गावातील तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यासह ग्रामस्थांनी नवीन तलाव खोदला. समतल चर, ३७ दगडी बांध, पाच हेक्टर शेती क्षेत्रात ढाळीचे बांध तयार करण्यात आले. चार हजार झाड लावण्याचे नियोजन असुन १ हजार ८०० खड्डे खोदण्यात आले. ९० शोषखड्डेही तयार केले. दोन नाल्यांचे खोलीकरण केले असून उत्पादक स्वरुपाची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामसेवक अशोक बोबडे यांनी दिली. जितेंद्र जोशी यांचा संवादआर्वी - प्रसिद्ध सिनेअभिनेते जितेंद्र जोशी यांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या नेरी (मिर्झापूर) या गावाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या कामाचे कौतुक केले. लोअर वर्धा प्रकल्पामुळे पुर्नवसित नेरी (मिर्झापूर) गावात पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याकरिता श्रमदानातून विहिर पुनर्भरण, शेततळे, शोषखड्डे, गाव तलाव, नालाबांध इत्यादी कामे पूर्ण केली आहे. सध्या नेरी तालुक्यात आघाडीवर आहे. सिनेअभिनेते जोशी यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सभा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जन्माच्या आधिपासून तर मृत्यूनंतर पाणी महत्वाचे आहे. वॉटर कपमुळे जलसंधारणाबरोबर मन संधारणाचे काम होत, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
भर उन्हातही ग्रामस्थांचे श्रमदान
By admin | Published: May 09, 2017 1:07 AM