लालसिंह ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : गिरड (पेठ) गावालगत असलेल्या श्रीराम तलावातील गाळाचा अनुगामी लोकराज्य महाअभियान आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उपसा करण्यात आल्याने बारमाही पाण्याची पूर्तता होणार आहे. यामुळे जनावरांच्या तृष्णा-तृप्तीची सोय होणार शिवाय, या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास ओलिताचे क्षेत्र वाढणार आहे. तलावाचे पात्र खोल झाल्याने बारमाही पाण्याची पूर्तता श्रीराम तलाव करणार आहे.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या उपक्रमांतर्गत श्रीराम तलावातील एक हजार तीनशे घनमीटर गाळाचा उपसा लोकसहभागातून करण्यात आला आहे. पन्नासवर शेतकऱ्यांनी तलावातून काढलेला सुपीक गाळ शेतात टाकला आहे. या तलावातून ४५० ट्रॅक्टर गाळाचा उपसा करून शेतशिवारात शेतकऱ्यांनी टाकलेला आहे. यामुळे शेतजमीन सुपीक होणार असून उत्पादनातही वाढ होईल.या तलावाच्या सभोवताल असणाºया विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. श्रीराम तलावातील गाळ साधारणत: दीड मीटर खोलीपर्यंत काढल्याने पाण्याचा साठा दीड मीटरने अधिक राहणार आहे. दरवर्षी या तलावाचा ग्रामपंचायतीच्या वतीने लिलाव करण्यात येतो. या तलावात माशांचे उत्पादन घेतले जाते. चार-सहा व्यावसायिकांना यातून रोजगार मिळतोच; ग्रामपंचायतीलादेखील उत्पन्न मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. कालांतराने मगन संग्रहालय समितीने या तलावाच्या पाळीचे अस्तरीकरण आणि खोलीकरण केले होते. दहा वर्षांनंतर हा तलाव गाळाने बुजला होता. या तलावात दरवर्षी बारमाही पाणी उपलब्द असते. मे महिन्याच्या अखेरीस हे पाणी आटते. मात्र, या तलावातील गाळ उपसा केल्याने यापुढे बारमाही पाण्याची सोय झाली आहे.अनुगामी लोकराज्य महा अभियानाच्या माध्यमातून गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या कार्यक्रमातून श्रीराम तलावातील गाळ उपसा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच विजय तडस, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फकिरा खडसे, अनुलोमचे समन्वयक प्रवीण पोहणे यांची उपस्थिती होती. आयोजनाकरिता आशीष भांदककर, अनुलोमचे वस्ती मित्र राहुल खडसे, अजय बावणे, वैभव कुंभलकर, प्रफुल्ल झाडे, खेमराज खंडाळे आदींनी सहकार्य केले.
बारमाही पाण्याची पूर्तता करेल श्रीराम तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:59 PM
गिरड (पेठ) गावालगत असलेल्या श्रीराम तलावातील गाळाचा अनुगामी लोकराज्य महाअभियान आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उपसा करण्यात आल्याने बारमाही पाण्याची पूर्तता होणार आहे.
ठळक मुद्देअनुलोमचा पुढाकार : लोकसहभागातून झाला १३०० घनमीटर गाळाचा उपसा