वर्धा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य विभाग व नामदेव महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सिकलसेल रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत उपचार व औषध या सुविधा उपलब्ध आहेत. सामान्य रुग्णालयात सिकलसेल रुग्णांसाठी टेलिमेडीसीन उपचार व मार्गदर्शन प्रणाली कार्यरत आहे. सिकलसेल रुग्णांना याचा लाभ होत असून जागृती केली जात आहे. टेलिमेडीसीन ही यंत्रणा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे नागपूर, मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क व वेळ निश्चित करून, अशा रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल संवाद साधून डॉक्टरांमार्फत योग्य उपचार व मार्गदर्शन सिकलसेल ुरुग्णांना करण्यात येते. टेलिमेडीसीन प्रचार पद्धतीला ५६ सिकलसेल रुग्णांची तपासणी करण्यात आली. एचबी, केएफटी, एलएफटी चाचण्या करून औषधी व योग्य तो सल्ला नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर दिप्ती चांद यांच्याशी रुग्णांचा थेट संवाद साधून देण्यात आला. या टेलिमेडीसीन शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी भेट देत सिकलसेल रुग्णांची विचारणा करून त्यांना मार्गदर्शन केले. याप्रकारे टेलिमेडीसीन शिबिर यंत्रणा टप्प्या-टप्प्याने सिकलसेल रुग्णांना बोलवून त्यांना लाभ घेता येईल, या पद्धतीने राबविण्यात येत आहे. शिबिराला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. छन्ना टेंबेकार, प्रशांत कठाणे, अन्नपूर्णा ढोबळे, आकाश खोपडे, अंकुश कांचनपुरे, देवांगणा वाघमारे, अरुणा नागपुरे आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
टेलिमेडीसीनच्या माध्यमातून सिकलसेल जागृती
By admin | Published: January 08, 2017 12:48 AM