आश्रम प्रतिष्ठाण सुरक्षेबाबत सजग सेवाग्राम : महात्मा गांधी आश्रमात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे; पण या कॅमेऱ्यांनाच माकडांच्या उपद्रवापासून सुरक्षित करण्याची वेळ आली आहे. कॅमेऱ्यांना काटेरी तार गुंडाळण्यात आले आहे. सेवाग्राम आश्रम जगासाठी प्रक्षेपण केंद्र ठरले आहे. वास्तू व वस्तू हे राष्ट्रीय ऐतिहासिक ठेवा आहे. याचे जतन करून नव्या पिढीपर्यंत या भूमीचाच नव्हे तर गांधीजींचा विचार पोहोचला पाहिजे. बापूंच्या संग्रहीत वस्तूतील त्यांचा चष्मा चोरीस गेला आणि संरक्षणाचा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अध्यक्ष जयवंत मठकर व मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच विरोध पत्करून खा. रामदास तडस यांच्या निधीतून आश्रमासाठी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. याचा उपयोग योग्यप्रकारे होत असून आश्रमातील बारिकसारिक घडामोडींवर कॅमेऱ्याचा वॉच आहे. कॅमेऱ्याचा वॉचवर माकडांचे संकट ओढवू लागले. आश्रमात मोठ्या प्रमाणात झाडे असून खायला, प्यायला व सुरक्षाही आहे. यामुळे माकडांचे कळप आश्रमात राहून नुकसान करतात. झाडांच्या फांद्या, कवेलू यासह सीसीटीव्ही कॅमेरा खांबावर माकडे चढायला लागली. यात महागड्या वस्तूला धोका होता. माकडांपासून कॅमेरे वाचविण्यासाठी काटेरी तार खालपासून वरपर्यंत लावण्यात आला आहे. परिसरातील मोकळ्या ठिकाणच्या पाच खांबांवर अशा तारा लावून कॅमेऱ्याचे संरक्षण करण्यात आले आहे.(वार्ताहर)
माकडांपासून संरक्षणार्थ सीसीटीव्ही कॅमेऱ्याला तारांचा वेढा
By admin | Published: August 18, 2016 12:41 AM