आकोली : वन व महसूल विभागाच्या आशीर्वादाने परिसरात सर्रास गौण खनिजांची चोरी होत आहे. यात आता चोरट्यांनी त्यांचा मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मातीकडे वळविला आहे.वन व महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गौण खनिज तस्कर निर्ढावले आहेत. दिवसाढवळ्या रेती, माती व मुरुमाची तस्करी होत आहे. हा प्रकार वन व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र दिसत नाही़ आता तर तस्करांनी वर्दळीच्या रस्त्यावरील मोकळ्या जागेतील मातीची चोरी करण्याचे सत्र सुरू केले आहे़ वर्धा ते माळेगाव (ठेका) मार्गावरील जामणी पुलानजीक अगदी रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील टेकडीवरील माती ओळीने ट्रॅक्टर लावून चोरली जात असल्याचे दिसते़ मुख्य मार्गावर ट्रॅक्टर उभे करून माती भरली जात आहे़ त्याच रस्त्याने वन व महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी ये-जा करतात. त्यांना हा प्रकार दिसू नये, ही आश्चर्याचीच बाब आहे़ वन व महसूल विभागातील तसेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)
गौण खनिज चोरांची नजर बांधकाम विभागाच्या मातीवर
By admin | Published: June 25, 2014 11:54 PM