वर्धा : शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी याकरिता मोठ्या चौकात वाहतुक नियंत्रक दिवे (सिग्नल्स) लावण्यात आले होते. ते लागले त्या काळातच त्याचा उपयोग झाला. गत दोन ते तीन वर्षांपासून ते केवळ चौकात नावालाच उभे आहेत. त्यांचा वापर केवळ जाहिरातींची फलके लावण्याकरिता होत असल्याचे दिसत आहे. या दिव्यांच्या खांबावर तजर काही ठिकाणी दिव्यांवरही जाहिरातींची फलके लावण्यात आली आहेत. यामुळे त्यांचे विद्रुपीकरण होत आहे. याची माहिती पालिका प्रशासनाला असूनही त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दिवे सुरू करण्यात काही वाटा पालिकेचा असता तरी त्यांच्याकडून याकडे मात्र सतत कानाडोळा झाल्याचे दिसून आले आहे. या नियंत्रक दिव्याचा पिशव्या अडकविण्याकरिता खुंटी म्हणून वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले़ या दिव्यांचे वीज बिल थकीत असल्याने ही यंत्रणा गत कित्येक दिवसांपासून बासनात गुंडाळण्यात आली आहे. शिवाजी चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे तर बेपत्ता झाल्याचे चित्र आहे. इतर वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबाचा बॅनर, होर्डिंग्ज लावण्याकरिता वापर केला जात आहे. आर्वी नाका परिसरातील एका वाहतूक नियंत्रक दिव्याचा वापर व्यावसायिकांकडून थैल्या अडकविण्याकरिता केला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले़ गुन्हेगारीवर वॉच ठेवण्याकरिता पोलीस विभागामार्फत या दिव्यांवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याने ते शोभेचे ठरत आहे़ या यंत्रणेवर लाखोंचा केलेला खर्च व्यर्थच गेल्याचे दिसते़ यामुळे वाहतुकीतील बेशिस्त आणखीच वाढली आहे़ याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
सिग्नल ठरताहेत शोभेचे
By admin | Published: March 29, 2015 2:11 AM