लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: त्या दोघांमधील बहीणभावाचे नाते असे होते की, एकाच मांडवात त्यांचे लग्न झाले आणि अखेर बहिणीपाठोपाठ भावानेही प्राण सोडले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना घडली सेवाग्राम येथे.म्हसाळा येथील शकुंतला क्षीरसागर (६०) व घनश्याम भोसकर (६४) यांचे मंगळवारी निधन झाले. बहिणीचे निधन झाल्याची वार्ता समजताच घनश्याम यांचेही प्राणोत्क्रमण झाले.
नागपुरच्या शकुंतला भोसेकर यांचा विवाह विनय क्षीरसागर यांच्याशी आणि घनशाम भोसकर यांचा पण विवाह १९८९ मध्ये एकाच मांडवात झाला.आपापले पारिवारिक जीवन सुखासमाधानाने जगत होते. शकुंतला क्षीरसागर या दोन वर्षाअगोदर हमदापूर येथील यशवंत विद्यालयातून सेवानिवृत्त झाल्या. सर्व काही व्यवस्थित असतानाच आजार बळावला आणि स्थानिक कस्तुरबा रूग्णालयात पंधरा दिवस उपचार घेत असताना मंगळवारला निधन झाले. तर दुसरीकडे घनशाम भोसकरसुध्दा आजारी असल्याने नागपूरच्या खाजगी रूग्णालयात उपचार घेत होते.
शकुंतला आपल्या या बहिणीचे निधन झाल्याची माहिती मिळताच ह्रदय विकाराच्या धक्क्याने घनशाम यांचेही निधन झाले.एकाच मांडवात आणि एकाच दिवशी बहिण भावांचे लग्न झाले आणि एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू झाला. दोन्ही परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शकुंतला क्षीरसागर यांना स्थानिक स्मशानभूमीत मंगळवारी मुलगा गौरवने मुखाग्नी दिला. तर खांदा पती आणि शीतल व अदिती या दोन मुलींनी दिला.घनशाम यांच्यावर बुधवारी अंतसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, विवाहित दोन मुली व एक अविवाहित मुलगी आणि आप्तस्वकिय आहे. दोघांच्याही परिवारावर दु:खाचा डोंगर मात्र कोसळला आहे.