वर्धा : हिंगणघाट येथून वर्धेच्या दिशेने येत असलेल्या तेतला लक्ष्मीनारायण रेड्डी ह.मु. गजानन नगर वर्धा याला धोत्रा चौरस्ता जवळ काही व्यक्तींनी अडवून धाकदपट करून त्याच्या जवळील ४८ हजारांची रोख हिसकाविली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी तेतला याला बळजबरी वाहनात बसवून त्याचे अपहरण केले. शिवाय दहा लाखांच्या खंडणीची मागणी करून दोन लाखांची खंडणी उकळल्यावर तेतला याला इंझापूर परिसरात सोडून दिले.
याच प्रकरणातील आरोपींना अल्लीपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांच्या मदतीने तेलंगाणा राज्यातील रणदिवे नगर, आदिलाबाद येथून अटक केली आहे. शेख मुखीद अहमद शेख युसुफ (३१), सूर्यकांत राम मटपती (३०), शाहरुख पठाण अजीज पठाण (२८), संजय देवन्ना ओसावार (३४), नंदकुमार रामचंद्र शेटे (२८), विठ्ठल पांडुरंग कांबळे (२८) सर्व रा. अदिलाबाद तेलंगाणा असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
अपहरणानंतर केली होती दहा लाखांची मागणी
आरोपींनी तेतला यांचे अपहरण केलेल्यांनी सुरूवातीला फिर्यादीजवळील ४८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर तेतलाचे अपहरण करून त्याची सुखरूप सुटका करण्यासाठी तब्बल दहा लाखांच्या रक्कमेची मागणी केली. इतकेच नव्हे तर मागणी केलेल्या खंडणीच्या रक्कमेपैकी दोन लाखांची खंडणी उकळत. तेतला याला इंझापूर परिसरात सोडून देत यशस्वी पळ काढला. शिवाय पुन्हा पुन्हा पैशांची मागणी करून धमकावत राहिले.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसही आले ॲक्शनमोडवर
जबरी चोरी, अपहरण, खंडणी याबाबतची तक्रार प्राप्त होताच अल्लीपूर पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य लक्षात घेत ठाणेदार सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनात तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतली. शिवाय गुन्ह्याचा झटपट छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहकार्य मागितले. आरोपींबाबतची तांत्रिक माहिती मिळताच पोलिसांच्या चमूने तेलंगाणा राज्यातील अदिलाबाद गाठून सहाही आरोपींना ताब्यात घेत अटक केली.
६.८६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
अटकेत असलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १ लाख ३१ हजार ९०० रुपयांची रोख, गुन्ह्यात वापरलेली टी.एस. १३ ई. सी. २८९१ क्रमांकाची कार, सहा महागडे मोबाईल असा एकूण ६ लाख ८६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे आरोपी पोलीस कोठडीदरम्यान आणखी काय कबुली देतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.