वर्धा : नागपूर येथील शेळ्या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी १०.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात शेळ्या चोरट्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय पद्धतीने माहिती घेतली असता काही चोरटे नागपूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनीही आपल्या हालचालींना गती देत नागपूर गाठले असता चोरटे यवतमाळ जिल्ह्यातून चोरून आणलेल्या शेळ्या प्रकाश ऊर्फ भुऱ्या माहुरे, रा. नागपूर याला विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी धर्मवीर श्रीराम चौहाण (वय ३१), पवन मोहनलाल पाली (२२), हिमांशू जगदीश कळंबे (१८) व प्रकाश देवराव माहुरे (४५, सर्व रा. नागपूर) यांना ताब्यात घेऊन अटक केली.
या चोरट्यांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच ३१ इके ८५४६), चार मोबाईल, तीन शेळ्या व रोख ११ हजार रुपये असा एकूण १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एक, वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस ठाणे हद्दीतील दोन, अल्लीपूर पोलीस ठाणे हद्दीतील एक, सावंगी (मेघे) पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे.