सोमवारची घटना : दोन्ही गटांवर गुन्हे दाखल वर्धा : सिंदी (रेल्वे) येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. शुभम संजय वांदिले, अक्षय वांदिले, दोन्ही रा. सिंदी (रेल्वे) व इतर चार जणांचा जखमींमध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून सिंदी पोलिसांनी गुन्हे नोंदविले. प्राप्त माहितीनुसार, जुन्या वाद उकरून काढत सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सिंदी रेल्वे येथील मातामंदीर पुलाजवळ वांदिले व वर्जे कुटुंबियांत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी झालेल्या हाणामारीत तलवार, चाकू व काठ्यांचा वापर झाल्याने शुभम वांदिले, अक्षय वांदिले व इतर चार असे एकूण सहा जण जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वांदिले यांच्याकडून शुभम वांदिले याने सिंदी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली तर वर्जे कुटूंबियांकडून बबलू रमेश वर्जे यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही गटाच्या तक्रारींवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. प्रकरणाचा पुढील तपास सिंदी (रेल्वे) पोलीस करीत आहेत.(शहर प्रतिनिधी) हटकणे भोवले शेताचा धुरा का पेटविला, अशी विचारणा करणाऱ्याला मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास मांडवा परिसरात घडली. माधव श्यामराव वाघमारे (६३) रा. मांडवा, असे जखमीचे नाव आहे. मांडवा येथील माधव वाघमारे यांनी तेथीलच ज्ञानेश्वर गोडकर याला तू शेताचा धुरा का पेटविला, अशी विचारणा केली. यामुळे संतापलेल्या ज्ञानेश्वरने जवळ असलेल्या हातोडीने माधवला मारहाण करून जखमी केले. याबाबत माधव वाघमारे यांनी सावंगी (मेघे) पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी ज्ञानेश्वर गोडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.
दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जखमी
By admin | Published: March 15, 2017 1:46 AM