देवळी : निम्न वर्धा प्रकल्पाच्या बांधकामासाठी सहा वर्षांपूर्वी तोडण्यात आलेला मोटारपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही. जामणी शिवारातील दोन शेतकऱ्यांना यामुळे ओलीत करण्यात व्यत्यय येत आहे. शिवाय अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.सततची नापिकीने शेतकरी कंटाळला आहे. यातच ओलिताची सोय असताना पिकांना ओलीत करु शकत नसल्याने हतबल झालेल्या या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. निम्न वर्धा व विद्युत मंडळ प्रशासनाचा तुघलकी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जामणी शिवारात गोविंद चिरकुट तिरळे यांच्याकडे साडेचार एकर जमीन आहे तर हरिदास मडावी यांच्याकडे सहा एकर शेती आाहे. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. शेतातून अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी तिरळे यांनी १९९५ ला व मडावी यांनी सन २००९ ला विहिरींचे बांधकाम करून मोटारपंपाची जोडणी घेतली. शेतात ओलिताची सुविधा झाल्यानंतर उत्पन्न वाढले. परंतु विकासाची बाब समोर करून २००९ मध्ये त्यांच्या शेतात निम्न वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा व १७ नंबरच्या सेतूचे बांधकामाला सुरूवात केली. याकरिता शेतातील विद्युत खांब व सर्व्हिस लाईन कापण्यात आली. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतातील लाईन पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यावर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा विसर पडला. शेतक्री वारंवार भेटले, लेखी तक्रार दिली. मात्र निम्न वर्धा प्रकल्प व विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सहा वर्षांच्या कालावधीत काम पूर्ण केले नाही. २००९ च्या आॅक्टोबर महिन्यात शेतातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यातही मोटारपंपाचे देयक २०१३ पर्यंतचे देण्यात आले. या दोन्ही शेतकऱ्यांनी देयकाचा भरणा केला. यानंतर मोटारपंपाची जोडणी शिल्लक दाखविण्यात आली. या सर्व प्रकाराने शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शेतातील विद्युत पोल व सर्व्हिसलाईन पूर्ववत करून देण्यापेक्षा, या कास्तकारांच्या मानसिकतेची अधिकाऱ्यांच्यावतीने विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.(प्रतिनिधी)
सहा वर्षांपासून वीजजोडणीला कोलदांडा
By admin | Published: June 10, 2015 2:21 AM