दररोज तासनतास वाहनांच्या रांगा : शासनाचे लेखी आश्वासन हवेतच विरले हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ येथील रेल्वे गेट क्रमांक १४ चे काम सुरू झाले. त्या कामाला २०१० पासून ब्रेक बसला. या काळात रखडलेले काम अद्यापही पूर्ण झाले नाही. हा मार्ग अतिशय वर्दळीचा असून येथे दररोज वाहनाच्या रांगा असतात. सदर काम पूर्ण करण्याकरिता येथील नागरिकांनी शासनाला निवेदन देत अनेक वेळा आंदोलने केली. यावेळी सदर पुलाचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र हे लेखी आश्वासन हवेतच विरले. यामुळे गुरुवारी येथील संतप्त नागरिकांनी पुन्हा रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रेल्वे पुलाचे काम गत अनेक वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. सन २०१० मध्ये या पुलाच्या व रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. संपूर्ण काम अद्यापही पुर्णत्वाला आले नाही. याबाबत नागरिकांना बरेच वेळा निवेदन दिले होते. त्यावेळी रेल्वे कार्यालयाने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. हे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसते. त्यानंतर नागरिकांनी पुन्हा २१ जानेवारी २०१६ रोजी निवेदन दिले. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने ३१ मार्च २०१६ पर्यंत काम पूर्ण होईल असे कळविले होते. तरीही या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी मे २०१६ मध्ये नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत काम पूर्ण होईल असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते; परंतु डिसेंबर २०१६ संपत असून अद्यापही पुलाचे काम अर्धवटच आहे. या कारणामुळे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गाड्या, आम नागरिक, शेतकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गेटवर ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. येथून सेवाग्राम व सावंगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना याचा त्रास होत आहे. यापूर्वी याच उडाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात सुद्धा झाले आहे. वेळोवेळी रेल्वे फाटक बंद होत असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. यामुळे आम नागरिकांना व प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला होता. अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनोज उपासने, जगदीश प्रसाद शुक्ला, प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, विनोद कुंभारे, भाऊराव कोटकर, अॅड. अनिता जोशी, संदेश थुल, राकेश नगरवार, विजय मोहता, संजय हावगे, अजय देवढे, नरेंद्र चुबंडे, राजू अरगुले, भारत पवार यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)
सहा वर्षांपासून रेल्वे पूल अपूर्णच
By admin | Published: December 30, 2016 12:29 AM