आर्वी : सात दिवसांपूर्वी शेतात ये-जा करण्यासाठी नाल्यावर मजुरांनी स्लॅब टाकला होता. या स्लॅबचे सेंट्रींग काढत असतानाच स्लॅब कोसळल्याने स्लॅबखाली दबून दोन छत्तीसगढी मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना २३ रोजी शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वाढोणा गावातील स्मशानभूमी जवळ घडली.
अशोक वरकडे (३५), नवल टेकाम (३२) अशी मृतकांची नावे आहे. सात दिवसांपूर्वी स्मशानभूमी जवळील नाल्यावर नागरिकांनी कंत्राटदाराकडे नाल्यावर पूल टाकण्यासाठी मागणी केली होती. कंत्राटदार प्रफुल रामटेके याने मजुरांना नाल्यावर स्लॅब टाकण्यास सांगितले. त्यानुसार सेंट्रींग टाकून स्लॅब टाकण्यात आला. स्लॅबवरील सेंट्रींग किमान २१ दिवस ठेवणे आवश्यक असतानाच मृतक मजुरांना छत्तीसगढ गावी जायचे असल्याने त्यांनी घाई करीत अवघ्या सात दिवसांतच स्लॅबचे सेंट्रींग काढण्यासाठी गेले. स्लॅबचे सेंट्रींग काढणे सुरू असतानाच स्लॅब कोसळला. मात्र, स्लॅबखाली दबून दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
मागील महिनाभरापासून दोन्ही मजूर माझ्याकडे पुलाच्या कामासाठी आले होते. नाल्यावरील पूल बांधण्यासाठी सरपंच वसंत भगत आणि नागरिकांनी आग्रह धरला होता. त्यामुळे मी पूल बांधण्यासाठी साहित्य देण्याचे कबूल करुन सोबत मजूरही दिले होते. नाल्यावरील पूल बांधलाही. पण, मजुरांना गावी जायचे असल्याने त्यांनी सात दिवसांपूर्वी टाकलेल्या स्लॅबचे सेंट्रींग काढले. परिणामी स्लॅब कोसळून दोन्ही मजूरांचा जागीच मृत्यू झाला.- प्रफुल्ल रामटेके, कंत्राटदार, नागपूर.