लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘मेरे सैंय्या भये कोतवाल, तो डर काहेका’ या म्हणीप्रमाणे एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने गावातीलच एका तरुणाला चक्क आष्टीच्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसमक्षच सुंदरीने (पोलीसी प्रसादासाठी वापरण्यात येणारा पट्टा) मारहाण केली. हा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता इतक्यावरच थांबला नाही तर त्याने सदर तरुणाला त्याच्या गुप्तांगावर लाथ मारून गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही घटना चार दिवसांपर्यंत दडपण्यात आली. पण नंतर या बेदम मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. अखेर पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आरोपी स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यावर भादंविसह अनुसूचित जाती तथा अनुसूचित जनजाती अत्याचार विरोधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. परंतु, ज्या पाेलीस निरीक्षकांसमक्ष हा प्रकार घडला त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस प्रशासनातील बडे अधिकारी काय कार्यवाही करतात, हे अद्याप गुलदस्त्यात असून त्याकडे आष्टी तालुक्यातील नागरिकांसह तक्रारकर्त्याचे लक्ष लागले आहे.
अन् अंमलदारावर झाली निलंबनाची कारवाई- सदर प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार विनायक घावट याला सहआरोपी करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिवाय या पोलीस अंमलदारावर खातेनिहाय कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजकीय पक्षातील ‘सुधीर’चा ‘सपोर्ट’
- हा सामाजिक कार्यकर्ता एका राजकीय पक्षातील ‘सुधीर’नामक पुढाऱ्याच्या घनिष्ठ संपर्कात असल्याने माझे कुणीही काही वाकडे करू शकत नाही, असा दम पोलीस तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना नेहमीच द्यायचा. इतकेच नव्हे, तर अवैध व्यवसाय करणाऱ्यांसमोर तो त्या ‘सुधीर’ला थेट भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून अधिकारी तुमच्यावर कारवाई करणार नाहीत असा ‘धीर’ देत हेाता. त्यामुळे या व्यक्तीच्या राजकीय वरदहस्ताचा तपास गरजेचा आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकाविण्याचा प्रकार - हा सामाजिक कार्यकर्ता तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, वैद्यकीय अधिकारी आदींना धमकाविण्याचा प्रकार सराईत पद्धतीने करतो, तसेच ‘सुधीर’कडे तक्रार पाठवून कारवाई करण्याची धमकी देऊन पैशाची मागणीही करतो.
आरोपीस ठोकल्या बेड्या- पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्याकडून एका युवकाला पोलीस पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबरोबरच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी आपल्या चमूसह आष्टी पोलीस ठाणे गाठून सखोल माहिती घेतली. शिवाय आरोपी राजेश श्रीराम ठाकरे (३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अवघ्या काही तासांतच अटक केली आहे.
माफीचा व्हिडिओ केला तयार - स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याची ‘इमेज’ वाढविण्यासाठी त्या गरीब युवकाला मारहाण करून त्याला मोबाइलसमोर मी असे करणार नाही, माझी चूक झाली, असे म्हणणारा व्हिडिओ तयार केला. ठाणेदाराने तो व्हिडिओ कुणालाही न देण्याचे सांगितले; पण स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने आपली कॉलर टाइट करण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर केल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.
आष्टी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस अधीक्षकांसह आपण स्वत:हा तातडीने आष्टी पोलीस स्टेशन गाठले. घटलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती जाणून घेत आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे.- यशवंत सोळंकी, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.