रक्कम परत मिळण्याची संधी : वर्धेत सात महिन्यात २३ जणांना ११.८५ लाखांचा गंडा रूपेश खैरी वर्धासध्या आॅनलाईन खरेदीसह व्यवहाराची प्रथा वाढत आहे. यात अनेकांना गंडा बसतो. काहींना एटीएमचा पासवर्ड विचारून गंडविले जाते. यात अनेकांना लाखोंचा चूना लागतो. अशा आॅनलाईन फसगत झालेल्या नागरिकांना आपली रक्कम गेली, ती आता परत मिळणार नाही, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण अशा फसवणुकीत नागरिकांना चिंता करण्याची गरज नाही. आॅनलाईन व्यवहारात झालेल्या फसवणुकीची रक्कम नागरिकांना देण्याची सवलत शासनाच्यावतीनेच दिली आहे. याचा लाभ घेण्याकरिता आॅनलाईन फसगत झालेल्या नागरिकांना केवळ सायबर सेलच्या माध्यमातून मंत्रालयात असलेल्या ‘सचिव, माहिती व तंत्रज्ञान संचालक’ यांच्या नावे अर्ज करण्याची गरज आहे. हा अर्ज करताना त्यांना शासनाने या संदर्भात दिलेल्या नियमानुसार काही रक्कम भरावी लागते. ही रक्कम भरून केलेल्या अर्जाची तपासणी होवून नागरिकांना चोरट्यांनी लांबविलेली रक्कम मिळण्याची संधी आहे. ही संधी केवळ आॅनलाईन फसगत झालेल्यांकरिताच आहे. ज्या कुणी आमिषाला बळी पडून बॅकेत जात रक्कम भरली त्यांना मात्र या सुविधेचा लाभ होत नाही. या सुविधेची माहिती अनेकांना नसल्याचे दिसून आले आहे. वर्धेत गत सात महिन्यात एटीएमच्या माध्यमातून २३ जणांना एकूण ११ लाख ८५ हजार ३५२ रुपयांनी गंडा बसल्याची नोंद आहे. या पैकी दोन गुन्ह्यातील १ लाख ८० हजार रुपये वसूल झाले आहे. यातील एक लाख २५ हजार ७०० रुपये कंपनीकडून वसूल करण्यात आले आहे. यात आतापर्यंत केवळ तिघांनाच अटक केल्याची माहिती आहे. अशा प्रकारात झालेल्या फसवणुकीचा शोध लागणे तसे कठीणच. रक्कम मिळविण्याकरिता रकमेनुसार भरावे लागणारे शुल्कफसवणुकीत गेलेली रक्कम मिळविण्याकरिता नागरिकांना गुन्हा दाखल असलेल्या जिल्ह्याच्या सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून अर्ज करण्याची गरज आहे. या अर्जाची किंमत ५० रुपये आहे. हा अर्ज थेट केल्यास कुठलाही लाभ होणार नाही. तो सायबर सेलच्या माध्यमातूनच होणे आवश्यक आहे. शुल्क भरण्याचा नियम १० हजार रुपयांपर्यंत गंडा बसल्यास अर्ज करताना रकमेच्या १० टक्के शुल्क भरावा लागणार आहे.१० ते ५० हजार रुपयापर्यंतच्या नुकसानाकरिता १ हजार रुपयासंह रकमेनुसार ५ टक्के शुल्क भरणे गरजेचे आहे.५० हजार ते १ लाख रुपयांकरिता ३ हजार रुपये आणि रकमेच्या चार टक्के शुल्क तर एक लाखा पेक्षा अधिक रक्कम असल्यास ५ हजार रुपये आणि रकमेच्या दोन टक्के शुल्क भरावे लागतील.माहिती असतानाही फसगत तुमचा एटीएम क्रमांक ब्लॉक झाला, तुुम्हाला नवा क्रमांक देण्यात येत आहे. असे म्हणत एटीएमचा पासवर्ड विचारून फसवणूक करण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. अशा घटना घडत असल्याची माहिती नागरिकांना असली तरी अशा थापांना ते बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतात टॉवर उभारण्यासंदर्भात पैशाची मागणी करून लाभ देण्याच्या आमिषाने फसविल्याच्या घटनाही समोर येत आहे. यापासून नागरिकांनी सावधान राहण्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून जनजागृती एटीएमच्या माध्यमातून फसगत झाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या, त्याच्या तक्रारीही पोलिसात आहे. त्यांचा तपास लागणे तसे कठीणच. मात्र पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. अशी फासगत होण्यापेक्षा नागरिकांनी सावधागिरी बाळगावी असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वर्धा पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रम म्हणून एसएमएस पाठविण्यात येत आहेत.
आॅनलाईन फसवणुकीत शासनाकडून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2015 1:58 AM