वर्धा : गरोदर महिलेच्या गर्भाशयातील बाळाची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासह तसेच किडनी स्टोन आदी पोटासंबंधीच्या विविध आजारांना वेळीच ट्रेस करण्यासाठी सोनोग्राफी महत्त्वाची ठरते; पण याच सोनोग्राफी मशिनचा गर्भलिंग तपासणीसाठी वापर होत स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये, या हेतूने ‘पीसीपीएनडीटी’ कायदा लागू करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धेत सध्या सोनोग्राफीचा बाजारच फुलत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तर वर्धा जिल्ह्याचे हृदय अशी ओळख असलेल्या आष्टी आणि समुद्रपूर तालुक्यात एकही सोनोग्राफी केंद्र नसल्याने या तालुक्यातील गरोदर महिलांसह नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे या परिसराचे मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन्ही आमदारांनी अद्यापही समुद्रपूर आणि आष्टी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू होण्यासाठी प्रयत्न केलेले नाही. आमदारांच्या हृदयाला पाझर केव्हा फुटेल याकडे संबंधित दोन्ही तालुक्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ६२ सोनोग्राफी केंद्र आहेत. तर दोन नवीन सोनोग्राफी केंद्रांबाबतचे प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाले आहे. हे दोन्ही नवीन प्रस्ताव ठोस निर्णयासाठी वेटिंगवर असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.२०१६ मध्ये होते ४५ सोनोग्राफी केंद्र
वर्धा जिल्ह्यात सन २०१६ मध्ये ४५ सोनोग्राफी केंद्र होते. त्यावेळी सहा सोनोग्राफी केंद्र बंद पडले होते. तर त्यानंतरच्या काळात वर्धा जिल्ह्यात सोनोग्राफी केंद्रांची संख्या झपाट्यानेच वाढली आहे.