लोकमत न्यूज नेटवर्कदारोडा : अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका झाल्यानंतर रेल्वेचा प्रवास पूर्ण करून पंजाब राज्यातील एक चौदा वर्षीय मुलगा थेट हिंगणघाट शहर गाठत हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरात पोहोचला. अशातच नागपूर-हैदराबाद मार्गावर गस्तीवर असलेल्या वडनेर पोलिसांची नजर या मुलावर गेली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीही आपले शासकीय वाहन थांबवून या मुलास विचारणा केली. पण मुलगाही वेगळीच भाषा बोलत असल्याने सुसंवादासाठी भाषा अडथळा ठरली. पण याही परिस्थितीवर पोलिसांनी मात केल्यावर सोनू रॉयशेख (१४, रा. रेल्वे कॉलनी, नया सतसंग, जललामद, जि. फाजिलखॉ, राज्य पंजाब) असे मुलाचे नाव व पत्ता सांगितला. तर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यावर तो कसाबसा वडनेरपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्यावर पोलिसांनीही त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. शिवाय संपूर्ण प्रकाराची माहिती वडनेरचे ठाणेदार कांचन पांडे यांना दिली. ठाणेदार पांडे यांनीही थोडाही वेळ न वाया घालवता पंजाब पोलिसांशी संपर्क साधत मुलाच्या कुटुंबीयांना मुलगा महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलिसांकडे सुखरूप असल्याची माहिती दिली. त्यानंतर सोनूच्या कुटुंबीयांसह पंजाब पोलिसांनी वडनेर गाठल्यावर चौदा वर्षी सोनूची घरवापसी झाली. सोनूच्या कुटुंबियांनी वडनेर पोलिसांचे आभारच मानले.
सुरुवातीला भाषा ठरली अडथळा- वडनेर पोलीस ठाण्यातील कर्मचारी मनोज धात्रक, प्रवीण सोनवणे हे गस्तीवर असताना नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहणा शिवारात अल्पवयीन मुलगा आढळून आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याबद्दलची माहिती विचारली. पण हा मुलगा पंजाबी भाषेत बोलत असल्याने आणि पोलिसांकडून हिंदी व मराठी भाषेत विचारलेले प्रश्न त्याला कळत नसल्याने पोलीस आणि मुलातील सुसंवादात भाषा अडथळा ठरली होती. पण नंतर पोलिसांनी मुलाला नजीकच्या चांद ढाब्यावर नेत पंजाबी बांधव असलेल्या दलजितसिंग याच्याशी संवाद करून दिला. त्यांच्यात झालेल्या संवादानंतर मुलगा हा पंजाब राज्यातील रहिवासी असल्याचे तसेच त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यावर तो रेल्वेचा प्रवास करीत वडनेरपर्यंत आल्याचे पुढे आले.
..अन् सोनूच्या मामाने गाठले वडनेर पोलीस स्टेशन- पोलीस म्हटले की कठोर मनाचे; पण याप्रकरणी ठाणेदारांसह वडरेन पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जोपासत थेट पंजाब पोलिसांशी संपर्क साधला. जलालमद शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यावर सोनूचे अज्ञाताने अपहरण केल्याप्रकरणी तेथे भादंविच्या ३५६ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे पुढे आले. त्यानंतर सोनूच्या कुटुंबीयांशी वडनेर पोलिसांचा संवाद घडला. त्यानंतर सोनूचे मामा व पंजाब पोलिसांनी वडनेर गाठले. पाच दिवसांनंतर कुटुंबीय दिसताच सोनूच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.