लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सोमवार ३१ मे रोजी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून कठोर निर्बंधात थोडी शिथिलता दिली आहे. याच शिथिलतेचा पहिल्या दिवस असलेल्या मंगळवारी अत्यावश्यक सेवेसह इतर सेवेची प्रतिष्ठानेही उघडल्या गेल्याने नागरिकांनी विविध साहित्य खरेदीसाठी वर्धा शहरातील बाजारपेठेत एकच गर्दी केली होती.
वर्धा नगरपालिका व लगतच्या अकरा ग्रामपंचायती, पुलगाव शहर व लगतच्या दोन ग्रामपंचायती तसेच हिंगणघाट शहर तसेच लगतच्या चार ग्रामपंचायती क्षेत्रात कोविड संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर जादा असल्याने या क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तू व सेवेची प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार तसेच इतर सेवेची दुकाने सोमवार, मंगळवार व बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत तर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्रात मॉल व शॉपिंग सेंटर वगळता अत्यावश्यक व इतर सेवेची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते १ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सदर शिथिलता मिळताच दुकाने उघडल्याने मंगळवारी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. नागरिकांच्या गर्दीमुळे बजाज चौक ते शिवाजी चौक या मार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
सामाजिक अंतराच्या नियमाला मिळाली बगल
कोविड संकटाच्या काळात सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन प्रत्येक व्यक्तीने करावे, असा आग्रह जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, मंगळवारी विविध दुकानांमध्ये याच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला बगल मिळत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
काेविड नियंत्रण पथक करीत होते सूचना
नागरिकांची गर्दी ही कोविडचा झपाट्याने संसर्ग वाढण्यासाठी पोषक असून कुठल्याही परिस्थितीत नागरिकांची गर्दी होऊ नये तसेच बेशिस्तांवर कारवाई करण्यासाठी कोविड नियंत्रक पथक तयार करण्यात आली आहे. याच कोविड नियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचारी मंगळवारी वर्धा शहरातील बाजारपेठेतील व्यावसायिकांसह नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वेळोवेळी करीत होते.