घरोघरी दिल्या पावत्या : पावतीवर स्वाक्षरीही नाही वायगाव (नि.) : येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाकडून शाळा सोडण्याच्या दाखला देण्यासाठी कुठलीही पावती न देता पैसे उकळण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते. पालकांना होणारा त्रास लक्षात घेता ११ ला वृत्त प्रकाशित केले. त्या वृत्ताची दखल घेत सदर प्रकरण सावरा-सावर करण्यासाठी पालकांना पावत्या देण्यात आल्या आहेत. परंतु, सदर पावतीवर कुठल्याच अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाही हे उल्लेखनिय. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याचा दाखला प्राप्त करण्यासाठी कुठल्याही प्रकारची शुल्क देण्याची गरज नसते असे सांगितले जाते. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार शिक्षणाचा हक्क आहे. परंतु, नियमांना डावलूनच वायगाव (नि.) येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ४ थ्या वर्गाच्या लिव्हींगसाठी पावती न देता पैसे उकळले जात होेते. पालकांनी पावती मागितल्यास त्यांना दाखला देण्यास नकार दिल्या जात होता. त्यामुळे पालकांच्या तक्रारीची दखल घेत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. वृत्तपत्रात सदर प्रकार प्रकाशित होताच सावरा-सावर करण्यासाठी ‘समाज सहभाग पावती’ फाडून पालकांच्या घरोघरी जाऊन देण्यात आल्या आहे.
वृत्त प्रकाशित होताच शिक्षकांची धावपळ
By admin | Published: May 13, 2017 1:20 AM