लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. या संकटातून शेतकरी बाहेर आला नाहीच तो जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या सोयाबीन पिकाचे तब्बल ६५ टक्के नुकसान झाले, तर आता ढगाळी वातावरण आणि थांबून थांबून होणाऱ्या कोसळधार पावसामुळे थेट सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. दिवाळीच्या तोंडावर पीक शेतकऱ्यांच्या घरी येत असल्याने सोयाबीनला दिवाळी बोनस असेच म्हणल्या जाते. इतकचे नव्हे तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाची लागवड करून समाधानकारक उत्पादन घेतात. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ३३ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच करावी लागली. या संकटाला मोठ्या धाडसाने शेतकऱ्यांनी ताेंड देत नाहीच तो अंकुरलेले सोयाबीन पीक वाढीच्या स्थितीत असतानाच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत पूरस्थितीचे संकटही ओढावले. याच अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या संकटामुळे तब्बल ६५ टक्के सोयाबीन पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर पूरस्थिती आणि अतिवृष्टीच्या संकटातून बचावल्या सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी योग्य निगा घेतल्याने ते सध्या कापणीच्या स्थितीत आले आहे; पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या ढगाळी वातावरणासह पावसामुळे सोयाबीन कापणी व मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या मुख्यालयातील बाजारपेठेत आवक घटली- ऐरवी ऑक्टोबर महिन्यापासून शेतकऱ्याचे सोयाबीन विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर येण्यास सुरुवात होते. गत वर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरू झाली असली तरी गत वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठत आवक चांगलीच घटल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मागील वर्षी १ ते ११ ऑक्टाेबर या काळात वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर विक्रीसाठी सोयाबीनची २ हजार ७९६ पोती आली होती, तर यंदा १ ते ११ ऑक्टोबर या काळात वर्धा बाजार समितीच्या यार्डवर केवळ २६५ पोतीच सोयाबीन विक्रीसाठी आल्याची नोंद घेण्यात आली आहे.
सोयाबीन पिकाची अंकुरण होण्याची भीती- ढगाळी वातावरण आणि परतीच्या पावसामुळे सोयाबीन कापणीला उशीर होत आहे. ऐन कापणीच्या वेळी अचानक पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे अंकुरण होऊन आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवड्यात वातावरण साफ असल्यास सोयाबीन कापणी व मळणीच्या कामाला गतीच मिळणार आहे. पण यंदा शेतकऱ्यांना निसर्ग साथ देते काय हे वेळच सांगणार आहे.
आठ दिवसांपूर्वी अनेकांनी उरकविली कापणीसह मळणी- गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. इतकेच नव्हे तर थांबून थांबून दामिणी गर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतजमीन ओली झाली असून हार्वेस्टरही शेतात जात नाही. त्यामुळे कापणी व मळणी कशी करावी, असाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. तर आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साहाय्याने सोयाबीनची मळणी केल्याचे सांगण्यात आले.