रोहणा : शासनाच्या सर्वच योजना आधार क्रमांकासोबत लिंक करण्यात आल्या आहेत. सर्वत्र आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला. मात्र अद्याप काही नागरिक यापासून वंचित आहेत. परिसरातील काही अपंग नागरिकांची आधार नोंदणी झालेली नाही. यामुळे शासकीय योजनांच्या लाभापासून अपंग व्यक्ती वंचित असून याकरिता आधार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्याची मागणी आहे. गॅस वितरण प्रणाली असो अथवा शिधा वाटप योजना, मनरेगा योजना प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी आधार क्रमांकाने सदर योजनेशी लिंक होणे शासनानेच अनिवार्य केले आहे. याचे परिपत्रक काढले असून त्याची कार्यालयात अंमलबजावणी होत आहे. असे असताना समाजातील प्रत्येक घटकाची आधार नोंदणी होणे गरजेचे ठरते. शासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अद्याप पाच टक्के नागरिकांची आधार नोंदणी उर्वरीत आहे. यात प्रामुख्यान अपंग व्यक्ती व भटकंती करुन उदरनिर्वाह करणारे आहेत. या नोंदणी मोहिमेची पुरेशी माहिती नसलेल्याने ते यापासून वंचित राहिले. तर अपंग व्यक्तींना नोंदणी करण्यासाठी सोयीचे केंद्र उपलब्ध न झाल्याने ते वंचित राहिले असल्याची माहिती आहे. आधार क्रमांकापासून वंचित असणाऱ्यांची नोंदणी करून त्यांना विविध योजनेत समाविष्ट करण्यासाठी नोंदणी मोहीम राबविणे आवश्यक झाले आहे. अपंग नोंदणी स्थळी जावूच शकत नसल्याने त्यांची नोंदणी अजूनही झालेली नाही. यासाठी गावागावात या अपंगाच्या घरी जावून त्यांची नोंदणी करण्यासाठी एखादी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच भटकंती करणाऱ्या समाजाला योजना राबविण्याच्या कालावधीत ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे तेथेच थांबण्यासाठी त्यांना पूर्वसूचना देवून त्यांची नोंदणी करण्याची मागणी आहे. तरच त्यांना योजनांच्या लाभ घेता येईल. शासनाने लवकरच मोहीम हाती घेवून आधार नोंदणीपासून वंचितांना दिलासा देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)
आधार क्रमांकापासून वंचित अपंगांसाठी विशेष मोहीम राबवा
By admin | Published: April 20, 2015 1:47 AM