लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : कृषी विभागातर्फे शेतीविकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध योजना व कार्यक्रम राबविले जातात. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देश सरकारचा आहे. याच उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन शेतकऱ्यांसाठी तळेगाव (श्या.पं.) येथे विशेष कार्यशाळा घेण्यात आली. उन्नती शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत तूर व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तळेगाव (श्या.पं) मध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय नागपूरचे डॉ. सतीश पोतकील, डॉ. आशीष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी तुर व सोयाबीन पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थान आदी बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी आर्वी उपविभागीय कृषी अधिकारी अरूण बलसाने, तंत्र अधिकारी परांजपे यांनी उन्नती शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर तालुका कृषी अधिकारी पी.डी. गुल्हाने यांनी २०१७-१८ त राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे पी.डी. गुल्हाने यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा
By admin | Published: June 15, 2017 12:42 AM