वर्धा : भारनियमनामुळे ओलित करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. यामुळे अनेकांचे पीक वाया जाते. येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले पायाने चालणारे स्प्रिंकलर यावर एक उपाय ठरत आहे. कमी खर्चात तयार होत असलेले हे स्प्रिंकलर शेतकऱ्यांकरिता वरदान ठरणारे आहे. विज्ञान तंत्रज्ञानाने संपूर्ण मानवी जीवनात क्रांती आणली असताना शेती अजूनही काही बाबतीत काळानुरूप गोष्टीतच अडकल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस वाढती मजुरी व खतांवर मोठा खर्च होवूनही बळीराला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतीला ओलित करण्यासाठी पाणी व विजेची गरज आहे. यात पाणी उपलब्ध होत पण विजेचा प्रश्न कायम आहे. दिवसभर शेतातील वीज पुरवठा खंडित असतो. त्यामुळे शेतीला नवी दिशा देण्याचा संकल्प करीत मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाच्या चार विद्यार्थ्यांनी विजेची आवश्यकता न पडणारे पायाने चालणारे स्प्रिंकलर यंत्र तयार केले आहे. त्यामुळे विजेची पर्वा न करता पैशाची व वेळेची बचत होणार आणि मजुरांची वाट न पाहता, शेतमालक व घरातील कोणताही सदस्य सोईनुसार स्वत:च्या शेतात ओलीत करू शकतो. जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पं.) येथील तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाच्या प्रतिक पट्टेवार, केतन ठाकरे, परेश यमुनाबादे व जयंत देशमुख या चार विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केले आहे. कृषी क्षेत्रात या यंत्राचा फायदा होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पंपाने १२० फुटपर्यंत पाणी खेचून आणता येते. जवळपास ५ ते ७ स्प्रिंकलर चालविण्याची शक्ती यात आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या प्रकल्पाला विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.(प्रतिनिधी)