वर्धा : रापमचे कर्मचारी २८ ऑक्टोबरपासून विलीनीकरणाचा लढा देत आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांतील निम्म्याहून अधिक कर्मचारी अजूनही आंदोलनात सहभागी असले तरी काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. त्यामुळे काही आगारातून प्रवासी वाहतुकीसाठी बस सोडल्या जात आहेत. एकूणच २३६ कर्मचाऱ्यांच्या जोरावर सध्या एसटी सुसाट धावत आहे. सद्य:स्थितीत ६८ बस दररोज किमान १९ हजार किमीचा प्रवास करून नागरिकांना प्रवासी वाहतूक सेवा देत आहे.
एकूण बस २१३, रस्त्यावर ६८
जिल्ह्यात रापमचे पाच आगार असून एकूण २१३ बस आहेत. या बस आंदोनापूर्वी या बस दररोज किमान ७५ हजार किमीचा प्रवास पूर्ण करून नागरिकांना प्रवासी वाहतुकीची सेवा द्यायच्या; पण आंदोलनानंतर व काही कर्मचारी कर्तव्यावर रजू झाल्याने केवळ ६८ बसच रस्त्यावर धावत असून त्या दररोज १९ हजार किमीचा प्रवास प्रत्येक दिवशी पूर्ण करीत आहे.
नवीन नियुक्त ५६ चालकाच्या हाती स्टिअरिंग
रामप कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ब्रेक लागावा म्हणून काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर काहींना कार्यमुक्त करण्यात आले; परंतु अजूनही आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशातच खाजगी कंपनीकडून चालकांची भरती करण्यात आली असून जिल्ह्यात ५६ चालक नेमण्यात आले आहे. त्यांच्या हाती आता रामपच्या लालपरीचे स्टेअरिंग दिले जात आहे.
७५० कर्मचारी आंदोलनात कायमच
रापमच्या कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरणाचा लढा दिला जात असून काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील पाच आगारांतील तब्बल ७५० कर्मचारी आंदोलनात सहभाग दर्शवून विलीनीकरणाचा लढा देत आहेत.
रापम कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असले तरी जिल्ह्यातील सर्वच आगारांत नवीन कंत्राटी चालकांच्या मदतीने सर्वच आगारांतून बस सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आर्वी आगारात ७० कर्मचारी रुजू झाले असून तीन चालक कंत्राटी पद्धतीने आहेत. आर्वी आगारातून २३ बसच्या माध्यमातून ९० फेऱ्या सुरू आहे.
- विनोद खंडार, वाहतूक नियंत्रक, बसस्थानक आर्वी.