लाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा : एसटीकडून बसमध्ये पैशांची देवाण-घेवाण कॅशलेस होण्यासाठी पावले टाकली जात आहेत. सध्या विविध सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. हे स्मार्ट कार्ड संबंधित प्रवाशानच्या आधार कार्ड आणि मोबाईलशी संलग्न असणार आहे. मात्र, आता कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज नसलेल्या ओळखपत्राची गरज नसलेले ओटीसी कार्ड (ओव्हर द कार्ड) तयार करण्यात आले आहे. या कार्डचा कुणालाही वापर करता येणार आहे. विविध योजनांतर्गत सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठीच्या स्मार्ट कार्ड पाठोपाठ एसटी महामंडळाने ओव्हर द काउंटर (ओटीसी) कार्ड सुरू केले आहे. या कार्डवर प्रवाशांचे नाव, छायाचित्र अशी कोणतीही माहिती नमूद नसेल. एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड रिचार्ज करून मिळेल. हे कार्ड बसमधील वाहकाच्या मशीनवर लावल्यानंतर प्रवासासाठीचे पैसे कार्डमधून जातील. या कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची यापुढे गरज भासणार नाही. ओटीसी कार्ड स्मार्ट कार्डसारखेच असले तरी त्यावर छायाचित्र किंवा प्रवाशाचे नावही नसेल. एसटीने करार केलेल्या एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड मिळणार आहे. कुठल्याही एसटी बसस्थानकांवर हे कार्ड मात्र मिळणार नसल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित एजंटला प्रवाशाचे नाव व मोबाईल क्रमांक सांगितल्यानंतर लगेच हे कार्ड मिळू शकेल. त्यावर केवळ कार्डचा क्रमांक व अन्य माहिती नमूद असणार आहे. या एजंटकडूनच प्रवाशांना आपल्या प्रवास खर्चानुसार रिचार्ज करून मिळेल. त्यांना पैसे दिल्यानंतर कार्ड रिचार्ज होणार आहे.असे आहे ओटीसी कार्डरिचार्ज केलेले कार्ड एसटी बसमध्ये वाहकाकडे द्यावे लागणार आहे. वाहक आपल्याकडील इटीआयएम मशीनवर हे कार्ड लावेल. कार्डची माहिती मशीनवर आल्यानंतर प्रवाशांना उतरण्याचा थांबा सांगावा लागणार आहे. त्यानुसार वाहक मशीनमधील थांब्याची निवड करेल. कार्डमध्ये पुरेसे पैसे असल्यास वाहकाकडून पुढील प्रक्रिया करून प्रवाशांना तिकीट दिले जाईल. कार्डमध्ये पैसे नसल्यास प्रवाशांना रोख रक्कम द्यावी लागेल. ही प्रक्रिया करताना प्रवाशाला कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागणार नाही. यात वाहकावरील ताण कमी होणार असून वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत.
परिवहन महामंडळ होतेय ‘स्मार्ट’ बदलत्या तंत्रज्ञान राज्य परिवहन महामंडळानेही स्वीकारले आहे. लवकरच राज्यातील सर्वच बसगाड्यांना (व्हीटीएस) व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात येणार असून घरबसल्यास एसटीचे लोकेशन कळणार आहे. आता कॅशलेस व्यवहारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत एसटीने ओटीसी कार्ड आणले आहे. त्यामुळे परिवहन महामंडळ स्मार्ट होत असल्याचे दिसून येत आहे.