लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : रात्रीच्या वेळी अनेक महिला एकट्यादुकट्या प्रवास करतात. प्रवास करताना त्यांच्या मनात विविध दडपण आणि अनाहूत भीती असते. त्यांना कधी काळी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अशा अनेक महिलांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना समाजकंटकांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी बसमधील दिवे बंद न करण्याच्या सूचना एसटीच्या चालक-वाहकांना दिल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसटीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.या निर्णयासंदर्भात विभाग नियंत्रक कार्यालयाला हे निर्देश देण्यात आले आहे. अनेक महिला साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेघ या बसमधून प्रवास करतात. आता या निर्णयामुळे महिलांमध्ये काही प्रमाणात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, तळेगाव, पुलगाव व वर्धा असे पाच आगार आहेत. या आगारात एकूण २१३ बसेस धावत आहेत. अनेक बसेस लांब पल्ल्याच्या असतात. त्यात अनेक महिलाही प्रवास करतात त्यामुळे हा आदेश सर्व विभाग नियंत्रक कार्यालयाकडून चालक-वाहकांपर्यंत पोहोचवून आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
विनंती करावी लागणार! महिलांना रात्रीच्यावेळी बसमधून प्रवास करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेऊन महामंडळाने रात्रीच्या सुमारास बसमधील सर्व दिवे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहे. आता बसमधील एका महिलेने जरी दिवे सुरू करण्याची विनंती केली तर चालक-वाहकाला रात्रीला दिवे सुरू ठेवावे लागणार आहे.
एसटी बसचा प्रवास सर्वात सुरक्षित आहे. महामंडळाकडून आलेल्या आदेशानुसार एखादी महिला रात्री प्रवास करीत असेल व तिने बसचा दिवा बंद न करण्याची सूचना केल्यास दिवे सुरुच राहतील, असे सर्व वाहक-चालक यांना निर्देश देण्यात आले आहे.- विनोद खंडार, बसस्थानक प्रमुख, आर्वी आगार.
महिलांकडून निर्णयाचे स्वागत आम्हा महिलांना नोकरी किंवा कुटुंबीयांची प्रकृती खराब झाली तर रात्री-बेरात्री प्रवास करावा लागतो. मात्र प्रवास करताना एक प्रकारची अनाहूत भीती मनात असते. परंतु आता महामंडळाने हा निर्णय घेतल्याने अनेक महिलांची भीती काही प्रमाणात कमी होईल, या निर्णयाचे मी स्वागत करते.- सुनिता दामोदर बोबडे.
एसटीने किंवा इतर खाजगी वाहनाने प्रवास करताना रात्री भीती वाटत होती. मात्र आता या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे आम्हा महिलांकडून स्वागतच आहे.- ललिता नारायण केने.