सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन काळात एसटीची चाके फार मोठ्या काळापर्यंत जागीच थांबल्याने या काळात अपघाताच्या घटनांत लक्षणीय घट झाली. ही बाब दिलासादायक ठरली.२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीने गावखेड्याशी नाळ जोडली असून एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. यामुळेच ती ग्रामीण प्रवाशांकरिता आधार ठरली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाने देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात थैमान घातले. यामुळे तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प होती. या काळात एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. एसटी बंद राहिल्याने गावगाडादेखील जागीच रुतला होता. ऑक्टोबरअखेर एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावू लागले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या झपाट्याने वाढू लागली. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनअंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची वाहतूक बंद होती. वर्धा विभागांतर्गत पाच आगार असून एकूण २२८ बसेस आहेत. या संपूर्ण बसेसची चाके जागीच थांबली. यात त्यामुळे २०१८-२०१९ च्या तुलनेत २०२०-२०२१ मध्ये अपघातांना ब्रेक लागला. २०१८-१९ या वर्षात ५२ अपघात झालेत. यात सहा जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी झाले. २०२०-२१ या वर्षात १६ अपघात झालेत. यात १० जण जखमी तर दोघांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत, गंभीर जखमी आणि अपंगत्व आलेल्या प्रवाशांना १ कोटी १ लाख ८०४ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीचा प्रवास सुरक्षित आणि आर्थिक नुकसानभरपाईची हमी असल्यानेच ग्रामीण शहरीच नव्हे, तर आता ग्रामीण भागातील प्रवासी एसटीतून प्रवासाला पसंती देत असल्याचे दिसून येते.
असे आहेत मदतीचे निकषखासगी प्रवासी वाहनांना अपघात झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाईची कुठलीही हमी नाही. मात्र, एसटीला अपघात झाल्यास प्रवाशांना महामंडळाकडून नुकसानभरपाई दिली जाते. एसटी अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशाच्या कुटुंबीयाला १० लाख रुपये, अपंगत्व आल्यास ५ लाख, गंभीर जखमी झाल्यास १ लाख तर किरकोळ जखमी झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते.