मागणी : प्रवाशांच्या वेळेची होईल बचतहिंगणघाट : चंद्रपूर-हिंगणघाट-नागपूर या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजाराच्या घरात आहे. जलद गाड्यांना या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हिंगणघाट, वरोरा, भद्रावती येथील प्रवाशांना मोजक्याच गाड्या असल्याने त्यांची तारबंळ उडते. अनेक वर्षापासून इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बल्लारशाह, वर्धा, नागपूर या शहरा दरम्यान इंटरसिटी चेअर कार ट्रेन सुरू करावी अशीही मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली. या गाडीची सोय उपलब्ध झाल्यास पासधारक प्रवासी तसेच विद्यार्थी व व्यापारीवर्गाला मोठा दिलासा मिळेल. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे नागपूर ते चंद्रपूर दरम्यान ये-जा करणाऱ्यांना सुविधा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. या मार्गावर गाड्यांच्या फेऱ्या अधिक असल्या तरी काही गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची ताटकळ होते. त्यामुळे अनेकजण बसगाडीने जाणे पसंत करतात. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे हे प्रवासी रेल्वेकडे वळण्याची शक्यता आहे.बल्लारशाह, चंद्रपुर, वरोरा, हिंगणघाट, वर्धा येथून कार्यालयीन कामकाजाकरिता, शिक्षणाकरिता तसेच व्यावसायिक कारणानी दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. याशिवाय वर्धा किंवा नागपूर येथून पुढे रेल्वे प्रवास करण्याकरिता जाणारे प्रवासी असतात. त्यांना या रेल्वेगाडीमुळे आधार होईल. चंद्रपूर ते नागपूर सरम्यान इंटरसिटीसारख्या रेल्वेगाड्या सुरू केल्यास प्रवाशांना गंतव्य स्थळी वेळेवर पोहचण्यास मदत होईल. प्रवाशांच्या त्रास कमी होईल. शिवाय प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कारण रेल्वेने प्रवास करणे कमी खर्चाचे असल्याने प्रवासी याचा लाभ घेण्याची शक्यता आहे.(शहर प्रतिनिधी)
चंद्रपूर-हिंगणघाटमार्गे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा
By admin | Published: November 07, 2016 12:49 AM