लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : बळीराजाचे जीवन मागील काही वर्षापासून पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. वृक्ष कटाईमुळे निसर्गातील समतोल बिघडला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असल्याने बळीराजाला कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. इतके असताना समाधानकारक पाऊस न येताच द्विधा मनस्थितीत असेल्या पुलगावसह परिसरातील बळीराजाने सध्या पेरणीच्या कामाला वेग दिल्याचे चित्र आहे.साधारणत: मृग नक्षत्रापूर्वी शेतकरी उन्हाळवाहीचे कामे पूर्ण करतात. त्यानंतर आकाशाकडे त्यांचे डोळे असते. परंतु या वर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हताश आणि उदास झाला आहे. शेतीचा हंगाम सुरू होणार एवढ्यात कर्ज माफीसाठी दहा दिवस चाललेले शेतकरी आंदोलन शासनाने कर्जमाफी जाहीर करून मागे घेण्यास भाग पाडले. सध्या द्विधा मनस्थितीत असलेल्या बळीराजाने अखेर पेरणीला प्रारंभ केला आहे. जगाचा पोशिंदा समजल्या जाणारा बळीराजा मागील काही वर्षात विविध समस्याचा सामना करत आहे. तो सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळयात फास अडकवू लागला आहे. शेतीची मशागत केल्यानंतर बी-बियाणे खतांची जुळवाजुळव केली तरच पेरणी. त्यातच निसर्गाने साथ दिली तर वेळोवेळी योग्य काळजी घेतले पीक बहरून झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरी येते. सध्या शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पहत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली तरी नवीन कर्जासाठी बँकांत चकरा माराव्या लागत आहे. बळीराजाने जमेल तेथून पैशाची जुळवाजुळव करीत अखेर पेरणीच्या कामाला गती दिली आहे.पेरणीयोग्य पावसाने शेतकरी समाधानीसेलगाव (लवणे) : दुपारच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. बघता-बघता कारंजा तालुक्यात सर्वदुर पेरणी योग्य पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग दिल्या जात आहे. यदा या भागात वेळीच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या आठवड्यात शासनाने दिलेली कर्जमाफी आणि वेळेवर आलेल्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, नवीन कर्ज मिळविणाऱ्यांना बँकांच्या चकरा माराव्या लागत आहे. अशीच साथ पुढेही निसर्गाने दिल्यास शेतकरी वर्गाला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. गत तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध कारणांने आर्थिक फटकाच सहन करावा लागला. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
द्विधा मनस्थितीत बळीराजाचा पेरणीला प्रारंभ
By admin | Published: June 19, 2017 1:16 AM