वर्धा : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व नशाबंदी मंडळाच्यावतीने तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून विद्यार्थी व युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधिनतेला प्रतिबंध घालण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. नशाबंदी मंडळाच्या पथकाकडून प्रबोधनात्मक कार्यक्रम, पथनाट्य, संवाद कार्यक्रम या माध्यमातून जागृती केली जात आहे, अशी माहिती यावेळी झालेल्या सभेतून देण्यात आली. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा संघटक प्रा. गणेश वनकर होते. आजचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत आहे. ही बाब लक्षात घेऊन पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर येवतकर यांनी बेटर वर्धा’ अभियानातून ही मोहीम हाती घेतली आहे. यावेळी बालकांसोबत संवाद साधताना येवतकर यांनी भारतात दररोज अडीच हजार लोकांचा मृत्यू केवळ तंबाखू सेवनाने होतो. भारतात १० लाखाहून अधिक व्यसनामुळे दगावतात. तर दर ३ सेकंदाला भारतातील एक विद्यार्थी तंबाखुचे पहिल्यांदा सेवन करतो. याची गती पाहता प्रभावी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.जगात तंबाखुमुळे होणाऱ्या मुख कर्करोगाचे सर्वाधिक रूग्ण भारतात आहेत. यामुळे नशाबंदी मंडळाकडून तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था असे अभियान हाती घेतले आहे. युवकांपर्यंत माहिती प्रभावीपणे पोहचविण्याकरिता प्रदर्शन व प्रत्यक्ष संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. शाळा व महाविद्यालयात तंबाखु सेवनाने होणारे रक्त वाहिन्यांचे विकार, हृदयरोग, स्ट्रोक म्हणजेच मेंदुचा विकार, परिधीय संवहनी रोग याची माहिती देण्यात येत आहे. वर्धा शहरातही विद्यार्थी तंबाखू, गुटखा, दारू इत्यादी प्रकारच्या व्यसनाचे अधिन झाले असल्याची बाब निदर्शनास येते. कार्यक्रमानिमित्त फिरताना शाळा, विद्यालय, महाविद्यालयात परिसरात पानटपऱ्या आढळून आल्या आहे. यावर निर्बंध घालणे गरजेचे झाले आहे. ही सगळी स्थिती लक्षात घेवून शाळा, महाविद्यालय तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी केले.कार्यक्रमाला प्रकाश नगराळे गुजर, साने यासह विद्यार्थी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणावर झालेल्या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा यावेळी संकल्प केला. (स्थानिक प्रतिनिधी)
तंबाखुमुक्त अभियानाला प्रारंभ
By admin | Published: December 29, 2014 2:02 AM