ग्रामस्थांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कन्नमवारग्राम : वर्धा-कारंजा-काटोल ही बसफेरी मागील दीड महिन्यांपासून अचानक बंद करण्यात आली. लग्नसराईच्या दिवसांत वर्धा आगाराने ही फेरी का बंद केली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. परिणामी, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बसफेरी त्वरित सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वर्धा येथून सकाळी ७.३० वाजता सुटणारी वर्धा-कारंजा-काटोल ही बस बरेच वर्षांपासून सुरू होती. ही बस एक ते दोन वर्षांपूर्वी वर्धा ते सावनेर, अशी सुरू होती. ती खरांगणा, बांगडापूर, कारंजा, धर्ती, मुर्ती मार्गे जात व येत होती; पण या एक-दोन वर्षांपासून ही बसफेरी बंद करून तीच बस वर्धा-कारंजा-काटोल व परत धर्ती, मुर्ती, कारंजा, बांगडापूर, खरांगणा मार्गे ये-जा करीत होती. या वेहेवर वर्धेला जाण्याकरिता कारंजा येथून दुसरी बस उपलब्ध नसल्याने या बसला बऱ्यापैकी प्रवासीही मिळत होते. परिसरातील शाळा, महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही सोय झाली होती; पण ही बस बंद झाल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रापमंच्या वर्धा विभागाने दखल घेत ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
वर्धा-कारंजा-काटोल बसफेरी सुरू करा
By admin | Published: June 25, 2017 12:44 AM