भाविकांना दिलासा : वर्षभरापासूनची मागणी झाली पूर्ण पोहणा : वरोरा ते आजनसरा ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी गत एक वर्षापासून प्रवाशांकडून करण्यात येत होती; पण त्याकडे दुर्लक्ष होत होते. ही मागणी अखेर परिवहन महामंडळाने मान्य केली. आजनसरा ते वरोरा ही बससेवा नुकतीच सुरू करण्यसात आली. वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवर धानोरा येथे गतवर्षी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. यामुळे परिसरातील प्रवाशांना वरोरा, वणी व चंद्रपूरचा प्रवास कमी अंतराचा झाला. वडनेर, शेकापूर (बाई), धानोरा हा मार्ग डांबरीकरणाने वाहतुकीस सज्ज असताना या मार्गाने लांब पल्ल्याची एकही बस नव्हती. प्रवाशांची अडचण लक्षात घेता हिंगणघाट शिवसेना तालुकाप्रमुख अभय वानखेडे, युवा सेना उपतालुका प्रमुख निखील वाघ, धानोराचे अजय महाजन, विशाल सरदार, गोपाल मेटंगले, स्वप्नील सरदार, मंगेश बरडे व सागर बेंद्रे यांनी वरोरा आगारप्रमुख गोवर्धन यांची भेट घेत पाठपुरावा केला. प्रवाशांची मागणी लक्षात घेता ही माढेळी, धानोरा, शेकापूर, वडनेर मार्गे बससेवा अखेर सुरू करण्यात आली. वरोरा ते आजनसरा ही बसफेरी सुरू झाल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे. आजनसरा हे वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाचे तीर्थस्थळ झाले आहे. विदर्भातील दूरवरचे भाविकही येथे स्वयंपाक घेऊन येत असल्याने बसफेरी गरजेची होती.(वार्ताहर)
आजनसरा ते वरोरा बससेवा सुरू
By admin | Published: December 25, 2016 2:24 AM