रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने घेतलेला तूर खरेदीचा निर्णय यंदा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. कधी ग्रेडरची कमतरता तर कधी उत्पन्नाची मर्यादा. आता तर खरेदी झालेल्या तुरीचे पोते शिवण्याकरिता महाराष्ट्र चार रंगात विभागण्यात आला आहे.खरेदीनंतर पोते शिवताना प्रत्येक विभागाला वेगवेगळा रंग देण्यात आल्याने त्या रंगाची सुतळी आणण्याकरिता खरेदी यंत्रणेची तारांबळ उडत आहे.आतापर्यंत मिळेल त्या सुतळीने दाभणाच्या सहाय्याने पोते शिवल्या जात होते. आता मात्र चार विभागांना वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत. तसेच आता मशीनच्या मदतीने पोते शिवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे तूर खरेदी केंद्रावर या रंगाच्या सुतळीकरिता पळापळ निर्माण झाली आहे.पहिले तर रंगाची सुतळी मिळत नाही आणि मिळाली तर ती सुतळी लागणारी मशीन कुठून आणावी? तूर खरेदी करताना केवळ सूतच नाही त्याला लेबलही लावावयाचे आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.
महाराष्ट्राला मिळालेले रंगविदर्भाला आॅरेंज, उत्तर महाराष्ट्र हिरवा, मराठवाडा लाल आणि पश्चिम महाराष्ट्राला पांढऱ्या रंगाची सुतळी वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
रंगीत सुतळीच्या अडचणीने काटे रखडलेकृषिमंत्र्यांनी काढलेल्या या फतव्यामुळे खरेदी यंत्रणा त्या रंगाची सुतळी आणि शिलाई मशीनच्या शोधात आहे. यामुळे अनेक ठिकाणी काटे रखडले आहेत.
कमिशनमधून मशीन आणि सुतळी खरेदीसुतळी आणि लेबल शासन देणार नाही तर ते खरेदी यंत्रणेला मिळणाऱ्या कमिशनमधून खरेदी करावयाचे आहे. दिलेल्या रंगाची सुतळी किंवा सूत खरेदी करताना चांगलीच दमछाक होत आहे. केवळ सूत आणून भागणार नाही तर पोते शिवण्याकरिता मशीनही उपलब्ध करून द्यावयाची आहे.
शासनाने तुरीचे पोते शिवण्याकरिता रंगीत धागे वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. या धाग्यांची व्यवस्था खरेदी विक्री संघाला करावयाची आहे. नागपूर विभागाला आॅरेंज रंगाचा धागा वापरण्याच्या सूचना आहेत.- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.