आर्वी : कृषी विभागाकडून तुषार व ठिंबक सिंचनाच्या लाभापासून तालुक्यातील शेतकरी वंचित होते. याबाबतचे अनुदान एक वर्षापासून देण्यात आले नाही. शेतकऱ्यांच्या या अनुदानाकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत अनुदान देण्याची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुषार व ठिंबक सिंचनाकरिता अर्ज केले; पण त्यांना अनुदान देण्यात आले नाही. गत एक वर्षापासून चकरा मारत असताना योजनेचा लाभ देण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. अखेर बुधवारी शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत १५ दिवसांत अनुदान देण्याची ग्वाही अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी दिली. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात माणिक निमकर, सुधीर जाजक, अरसलान खान, अनिल झामरे, धीरज गिरडे यासह शेतकरी १९ सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी ठिय्या आंदोलन
By admin | Published: September 17, 2015 2:45 AM