सय्यदना मुकद्दल सैफुद्दीन : बोहरा मशीद परिसरात प्रवचनपुलगाव : मानवी जीवन व परमेश्वराची आराधना या विषयी निगडीत अनेक चांगल्या गोष्टी इस्लाम धर्माच्या गं्रथात आहेत. त्या जर आपण, आचरणात आणल्या, तर मानवी जीवन हे सुख समृद्धी व आनंदाने भरून राहील. जगातला कुठलाही धर्म वाईट नाही. वाईट आहे ती मानवी प्रवृत्ती. धर्माच्या मूलभूत सिद्धांतातूनच मानवी जीवन घडत असते. यामुळे बोहरा समाज बांधवानी इस्लामच्या मुलभूत सिद्धांताप्रती कटिबद्ध राहून वाईट प्रवृत्तीपासून दूर राहा, असे मौलिक बोधप्रद विचार बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना मुकद्दल सैफुद्दीन यांनी व्यक्त केले.बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरू सय्यदना डॉ. मुकद्दल सैफुद्दीन यांचे गुरुवारी सकाळी शहरात आगमन झाले. याप्रसंगी समाज बांधवांतर्फे बुरहानी गाईडसच्या कार्यकर्त्यांनी सैफी स्काऊट बँडवर धार्मिक गितांनी व अविस्मरणीय असे स्वागत केले. या प्रसंगी बोहरा मशीद परिसरात धर्मगुरूंच्या प्रवचनाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त मार्गदर्शन केले. या प्रसंगी इस्लाम धर्माच्या रक्षणार्थ ज्या महान भक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या पावन स्मृतीत शोक व्यक्त करण्यात आला. या भव्य स्वागतासाठी अमरावती येथील सैफी स्काऊट बँड, विविध ठिकाणाहून आलेले समाज बांधव यांनी धर्मगुरुंचे भव्य स्वागत केले. कार्यक्रमासाठी समाज प्रमुख वालीमुल्ला हकिमुद्दीन ताहेर अली, जुजरभाई, गुलाम अब्बास, अबिजर बोमान अली बोहरा, कादिरभाई, नुरुद्दीन बुरहानी, खोमेजाभाई यांच्यासह समाज बांधवाचे योगदान होते.(तालुका प्रतिनिधी)
इस्लामच्या मूलभूत सिद्धांताप्रती कटिबद्ध राहून वाईट प्रवृत्तीपासून दूर राहा
By admin | Published: February 03, 2017 1:55 AM