लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : महावितरणकडून थकबाकीचे कारण पुढे करून कृषी पंपांचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. महावितरणे ही कार्यवाही थांबवित शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व संदीप भिसे यांनी केले.महावितरणच्या धडक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी पंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर विहिरीत पाणी असतानाही सिंंचनाअभावी उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महावितरणने ही मोहीम तातडीने थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना २४ तास विद्युतपुरवठा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. नारा टी-पॉईंवर करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलन स्थळ गाठून महावितरणचे अधिकारी राजूरकर यांच्याशी चर्चा घडवून दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या ठोस आश्वासनाअंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.