राकेश मिश्रा : ‘वर्तमान स्थितीत इतिहासाची गरज’ विषयावर व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भारताचा इतिहास सुधारणावादी आहे. अनेक थोर महापुरूषांनी आपले सर्वस्व भारतीय समाजाच्या उत्थानासाठी अर्पण केले. परंतु अशा गौरवशाली इतिहासाला अंधश्रद्धा, कर्मकांड, चमत्कार आदी अवैज्ञानिक गोष्टी जोडून विकृत करण्याचा प्रयत्न काही जण सातत्याने करीत आहेत. ही विकृतीकरणाची प्रक्रिया परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्यांनी तसेच बुद्धीजीवी व्यक्तींनी थांबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. राकेश मिश्रा यांनी केले. महाराष्ट्र अंनिस, राष्ट्रसेवा दल, अनेकान्त स्वाध्याय मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीत २८ व्या अभ्यासवर्गात ‘वर्तमान स्थितीत इतिहासाची गरज’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, डॉ. सिद्धार्थ बुटले, राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रा. डॉ. राकेश मिश्रा पुढे म्हणाले, इतिहासातून महापुरूषांच्या विचारांची प्रेरणा घेवून आज कार्य करणे आवश्यक आहे. महापुरूषांच्या नावावर आज भांडणे लावली जात आहे. हा प्रकार निंदनिय आहे. त्यामुळे प्रत्येक वाचकाने आता ऐतिहासिक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमादरम्यान बाबाराव किटे, डॉ. सिद्धार्थ बुटले, गजेंद्र सुरकार आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी वैज्ञानिक दृष्टीकोण व जादुटोणा कायदा याविषयीही माहिती दिली. प्रारंभी आम्ही प्रकाशबीजे रूजवित चाललो, हे गीत संजय भगत, नरेंद्र कांबळे, अॅड. पूजा जाधव, भरत कोकावार यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील सावध यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुनील ढाले, अजय मोहोड, प्रा अजय सावरकर, सारीका डेहनकर, विठ्ठल गुल्हाणे, रवी कांबळे, स्वप्नील सुखदेवे, भास्कर नेवारे, पूजा कांबळे, पंकज इंगोले यांच्यासह अंनिसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिरात पार पडलेल्या २८ व्या अभ्यास वर्गाच्या कार्यक्रम सोहळ्याला शहरातील गणमान्य व्यक्तींसह मोठ्या संख्येने महिला-पुरुष व अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
इतिहासाला विकृत करण्याची प्रक्रिया थांबवा
By admin | Published: June 15, 2017 12:46 AM