शेतकरी संप सुरूच : बाजार समितीच्या फाटकाजवळ ओतले दूध लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आश्वासनावर शेतकऱ्यांचा संप सुटल्याची सर्वत्र चर्चा असताना वर्धेत ठोस निर्णयाशिवाय माघार नाही, असे म्हणत शेतकऱ्यांनी त्यांचा संप अधिक तीव्र केल्याचे दिसून आले आहे. रविवारी सकाळी संभाजी ब्रिगेडच्या मदतीने शेतकऱ्यांनी सालोड (हिरापूर) येथील टी पॉर्इंटवर खोड जाळून वाहने अडविली. शिवाय रस्त्यावर भाजी फेकली. तर वर्धेतील दूध उत्पादकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारावर येत घोषणाबाजी करीत उड्डाण पुलावर दूध ओतले. शेतकऱ्यांचा संप सुटला अशी चर्चा सुरू असतानाच तो अधिक भडकत असल्याचे दिसून आले आहे. येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सालोड येथील टी पॉर्इंटवर बळीराजाच्या मदतीकरिता खोड जाळत रस्ता रोको केला. यामुळे यवतमाळ, अमरावती मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या रस्ता रोको दरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकत शासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपाने सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधाते, तुषार उमले, अतुल शेंद्रे, वैभव तळवेकर, रूपेश वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर ११ वाजताच्या सुमारास वर्धेतील दूध उत्पादकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येत आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर दूध फेकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर सकाळी १० वाजतापासून शहरानजीकच्या गावखेड्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येणे सुरू केले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळा झालेल्या शेतकऱ्यांसह दूध उत्पादकांनी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत दूध रस्त्यावर फेकत रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी आदी शेतमालासह दुधाला सरकारने योग्य भाव देत स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी केली. आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मदने, पोलीस निरीक्षक गणेश इंगोले यांच्यासह शहर पोलिसांच्या चमुने आंदोलनस्थळ गाठले. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी उड्डाण पुलावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनात डॉ. यशवंत सुरकार, दिलीप बुरांडे, धर्मराज बुरांडे, संजय नक्षीने, अनिल पोटदुखे, बंडू नंदनवार, धीरज वाटगुळे, अरुण मोहर्ले, विलास गुरनुले, प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
सालोडात खोड जाळून रस्ता रोको
By admin | Published: June 05, 2017 1:00 AM